
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाची कधी संततधार, तर कधी रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांतील पाणीपातळीत काहीशी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 76.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर, प्रमुख 15पैकी आठ धरणे पूर्णपणे भरली आहेत. राधानगरी धरणाचा सध्या एक दरवाजा उघडला आहे.
जिल्ह्यात आज दुपारी साडेअकरापर्यंत गगनबावडा तालुक्यात 76.4 मि.मी., शाहूवाडी 41, पन्हाळा 27.2, चंदगड 24.9, आजरा 17.4, राधानगरी 16.2, भुदरगड 13.6, करवीर 8.1, गडहिंग्लज 10.9, कागल 7.0, हातकणंगले 3.3, शिरोळ तालुक्यात 1.1 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांत 90.69 टीएमसी पाणीसाठा असून, धरणांच्या एकूण पाणीक्षमतेच्या तुलनेत 98.77 टक्के पाणीसाठा झाला आहे. राधानगरी, तुळशी, कडवी, चिकोत्रा, चित्री, कोदे, जांबरे व घटप्रभा हे आठ छोटे-मोठे धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आजच्या नोंदीनुसार, राधानगरी 233.51, तुळशी 97.56, वारणा 972.73, दूधगंगा 708.94, कासारी 76.99, कडवी 71.24, कुंभी 74.40, पाटगाव 103.69, चिकोत्रा 43.12, चित्री 53.410, जंगमहट्टी 34.650, घटप्रभा 44.170, जांबरे 23.230, आंबेओहोळ 30.980, कोदे ल.पा. 6.060 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
राधानगरी धरणातून 2 हजार 828 क्युसेक विसर्ग
राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, गेल्या चार-पाच दिवसांत धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले होते. सध्या धरणाचा तिसऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून, सकाळी सातच्या अहवालानुसार धरणाच्या विद्युतविमोचकातून एक हजार 400 व सांडव्यातून एक हजार 0428 असा एकूण दोन हजार 828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
14 बंधारे पाण्याखाली
पावसामुळे जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव आणि कासारी नदीवरील यवलूज व ठाणे आळवे या बंधाऱयांचा समावेश आहे. तर, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 23.6 फूट होती. पंचगंगेची इशारापातळी 39 फूट व धोकापातळी 43 फूट आहे.






























































