कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा दिमाखात साजरा

करवीर निवासिनी श्री अंबाबाई,श्री तुळजाभवानी आणि गरुमहाराजांच्या पालखी पाठोपाठ नवीन राजवाडा येथून मेबॅक वाहनातून पारंपरिक लवाजम्यासह ऐतिहासिक दसरा चौकात दाखल झालेल्या शाही परिवाराच्या उपस्थित म्हैसूर पाठोपाठ देशात प्रसिद्ध असलेल्या करवीर संस्थानचा शाही दसरा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मावळत्या सुर्याच्या साक्षीने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांनी सजविलेल्या लकडकोटमधील शमीच्या पानांचे पुजन‌ करताच, कोल्हापूरकरांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.

परंपरेनुसार सुर्यास्तापुर्वी जुना राजवाडा येथून श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि गरुमहाराजांच्या पालखीचे लवाजम्यासह दसरा चौक मैदानात आगमन झाले.पाठोपाठ नविन राजवाड्यातून पुढे पोलिस दलाच्या ताफ्यातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती,यशराजे छत्रपती पारंपरिक मेबॅक वाहनातून नाही लवाजम्यासह दाखल झाले. यावेळी संस्थानचे गीत, पोलिस बॅंडची धुन तसेच बंदुकीच्या फैरी झाडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शामियान्यात उपस्थित सरदार घराण्यातील वारसदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत स्विकारुन, शाही परिवाराच्या हस्ते लकडकोटमध्ये सजविलेल्या शमीच्या पानांचे विधीवत पूजन करण्यात आले.शाही परिवाराने सोने लुटताच, बंदुकीच्या फैरी झाडल्यानंतर उपस्थित कोल्हापुरकरांनी शमीची पाने लुटण्यासाठी धाव घेतली. यानंतर कोल्हापूरकरांकडून शमीच्या पानांचा स्वीकार करत, विजयादशमी दसऱ्याच्या शुभेच्छा देत शाही लवाजमा जुना राजवाडा येथील भवानी मंडपाकडे मार्गस्थ झाला.

हत्ती, घोडे, मावळ्यांसह पारंपरिक मिरवणूक

करवीर संस्थांनच्या या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यासाठी आज सजवलेले हत्ती, उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात ऐतिहासिक भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते.

या सोहळयास पालकमंत्री हसन मुश्रीफ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,पद्मश्री प्रतापसिंह जाधव,माजी राज्यपाल डॉ.डी.वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य.अधिकारी संतोष पाटील आदींसह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर,पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते.