कोल्हापूर महापालिकांची प्रारूप प्रभागरचना जाहीर, नगरसेवकांची संख्या 11ने वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गामुळे गेल्या सव्वा वर्षापासून रखडलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला असून, मंगळवारी सकाळी अधिकृतपणे प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. यंदा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार त्रिसदस्यीय प्रभाग समितीमुळे यापूर्वीच्या 77 प्रभागांचे आता 31 प्रभाग झाले असून, स्वीकृतसह 81 नगरसेवकांची संख्या आता 92 झाली आहे. दरम्यान, प्रभागांच्या भौगोलिक रचनेत मोठा फरक पडला आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन वेळा निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्याने आयुक्त कादंबरी बलकवडे या आजतागायत प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. याच कालावधीत राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकसदस्य प्रभागरचना रद्द करून त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेतला. त्यामुळे तत्पूर्वी झालेली आरक्षण सोडतही रद्द करावी लागली होती. दरम्यान, महापालिकेकडून त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार लोकसंख्या व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून प्रारूप प्रभागरचना आराखडा तयार करण्यात आला. 15 जानेवारी रोजी पाठविण्यात आलेल्या या आराखडय़ाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यानंतर आज हा प्रारूप आराखडा महापालिकेच्या सर्व चार विभागीय कार्यालयांतर्गत ठिकठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला. हा आराखडा ऑनलाइनही उपलब्ध करून देण्यात आला आहे. बदललेली प्रभागरचना पाहण्यासाठी इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत.

यापूर्वीचे 46 प्रभाग कमी झाले असून, आता त्रिसदस्यीय प्रभाग समितीनुसार 31 प्रभाग झाले आहेत. यापूर्वी सुमारे 3 हजार ते 6 हजार लोकसंख्येप्रमाणे असलेले 77 प्रभाग आता 16 हजार ते 19 हजारच्या लोकसंख्येनुसार 31 प्रभाग झाले आहेत. प्रभाग क्र. 2, 3, 9, 18 व 20 हे पाच प्रभाग 19 हजार ते 20 हजारच्या आतील लोकसंख्येचे आहेत, तर प्रभाग क्रमांक 31 हा सर्वांत कमी 12 हजार 775 इतक्या लोकसंख्येचा आहे.