जनतेचा जीव वाचविण्यासाठी पुढे या; अन्यथा महाराष्ट्र माफ करणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राची अनेक टप्प्यांत अडवणूक होत आहे. आता कोरोना लसीकरण पुरवठय़ातही अक्षम्य अडवणूक करून नाहक बदनामी करण्यात येऊ लागली आहे. निव्वळ सत्तेसाठी सुरू असलेल्या भाजपच्या या गलिच्छ राजकारणाचा आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. कोरोना महामारीत जनतेचा जीव वाचवण्यासाठी पुढे या; अन्यथा महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असा इशाराही भाजपला देण्यात आला.

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सत्तेसाठी अजूनही गलिच्छ राजकारण करीत आहेत. केंद्र सरकारमधील काही मंत्री त्यांना साथ देत आहेत. अनेक षडयंत्र करूनसुद्धा महाविकास आघाडी सरकार पडत नसल्याने आता कोरोना लसीचा पुरवठा रोखून जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यात येत आहे.

याच्या निषेधार्थ आज जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, मंजीत माने उपस्थित होते.

पथक नको, मदत पाठवा – संजय पवार

महाराष्ट्रात महापूर आला त्यावेळी वारंवार मागणी करूनही केंद्रीय पथक पाठविले नाही. विरोधी पक्षनेत्यांनी त्यावेळीही राजकारण करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आता कोरोनाच्या दुसऱया लाटेत लसींचा पुरवठा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, लसीऐवजी केंद्रीय पथक पाठवून दिले. त्यामुळे पथक नको; पण मागणी केल्यानुसार कोविड प्रतिबंधक लस पाठवा, असा टोला जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी लगावला.