
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईतील चाळ संस्कृतीचा आणखी एक साक्षीदार आणखी काही दिवसांनी जमीनदोस्त होईल. गिरगावातील क्रांतिनगर या चाळीचा मेट्रो बळी घेईल. रविवारी या चाळीतून विस्थापित झालेल्या, होणाऱ्या शेकडो रहिवाशांनी या चाळीच्या पटांगणात गर्दी केली आणि गेल्या चार पिढय़ांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या या ‘आजोबा’ला अखेरचा दंडवत केला.
गिरगावच्या क्रांतिनगरातील सवाशे कुटुंबे पुन्हा एकदा पटांगणात जमली होती. स्नेहभोजनाचा तर आनंद होताच, पण त्यापेक्षा ही चाळ नामशेष होणार याचे दुःख अधिक होते. चाळीतील घर छोटेसे होते, पण शेजारधर्म मोठा होता. होळी, दिवाळी, दहीहंडी असे सण सर्वजण मोठय़ा उत्साहाने साजरे करायचे. गल्ली क्रिकेटला ऊत यायचा. कुणाला साधा ताप आला तरी अख्खी चाळ धावून यायची. आता मेट्रोवाले मोठे घर देतील. त्या मोठय़ा घरात ऐसपैस जागा मिळेल, पण धावून येणारा शेजारधर्म मिळेल का? फ्लॅटच्या बंद दाराआड स्वतःला कोंडून घ्यावे लागेल का? अशा अनेक प्रश्नांमुळे कावरेबावरे झालेले
रहिवासी रविवारी एकत्र आले, स्नेहभोजन घेतले, पण घास घशातच अडकला!
प्रशांत हरयाण, सुनीता हरयाण, संजय परब, वेदांग म्हात्रे, तिमीर म्हात्रे ही नव्या-जुन्या पिढीतील मंडळी खूपच हळवी झाली होती. या चाळीने त्यांना नेमके काय दिले याच्या आठवणी जागवताना तर अनेकांना अश्रू अनावर झाले होते. गेल्या एप्रिलमध्ये मेट्रोने या चाळीतील रहिवाशांना नोटीस दिली. आता आपला मुक्काम हलवावा लागणार हे निश्चित झाले. मेट्रो येत्या चार वर्षांत त्यांना 400 स्क्वेअर फुटांचे घर देईल. शिवाय तोपर्यंत प्रत्येक महिन्याचे 25 हजार रुपये भाडेही देईल. मात्र आता चाळीत राहण्याचे सुख मिळणार नाही, याची खंत सर्वांनीच व्यक्त केली.
स्नेहसंमेलनाच्या निमित्तने सर्वजण एकत्र आले होते. कुणी आपल्या नातवंडांना आणले होते, नामशेष होणारी चाळ संस्कृती दाखवायला. कुणी चाळीचे, शेजारचे रस्ते, दुकानदार यांचेही शूटिंग केले. आता ती चित्रफित जपून ठेवली जाईल. कधीतरी आवर्जुन पाहिली जाईल आणि चाळीच्या आठवणींचे गहीवर रोखले जातील!!




























































