धक्कादायक! महिला सुरक्षारक्षकाने मागितला गर्भवती असल्याचा पुरावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

विमानतळावरची सुरक्षा नेहमीच काटेकोरपणे पार पाडली जाते. पण त्याच सुरक्षेचा कधी अतिरेक झाला तर प्रश्नचिन्ह उभं राहतं. अशीच एक घटना गुवाहाटीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. सीआयएसएफच्या एका महिला कर्मचाऱ्याने महिलेला ती गर्भवती असल्याचा पुरावा देण्यास सांगितले आणि तिला विवस्त्र करून तिची झडती घेतली. याप्रकाराची सर्व स्तरांतून टीका केली जात आहे.

शिवम सर्मह आणि डोली गोस्वामी हे जोडपं गुवाहाटी वरून दिल्लीला जात होतं. डोली तिच्या वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून दिल्लीला परतत असताना गुवाहाटी विमानतळावर सुरक्षा रक्षकांच्या तपासणी केंद्राकडे गेली असता सीआयएसएफच्या एका महिला कर्मचारीने तिला गर्भवती असल्याचा पुरावा देण्यास सांगितला. तसेच तिला विवस्त्र करून तिची झडती घेतली. विशेष म्हणजे त्या कर्मचारी महिलेनं डॅाक्टरांना न बोलवता स्वत:च त्या महिलेची तपासणी केली.

दरम्यान, घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवम सर्मह यांनी हा सर्व प्रकार सोशल साईटवर पोस्ट केला. ही घटना सीआयएसएफच्या वरिष्ठांना कळताच त्यांनी त्या महिला कर्मचारीची तात्काळ बदली केली आहे.