लेख – सांगलीशी ‘भावबंध’न… अन् हेमाचे नाव लता झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रकाश कांबळे

ब्रह्मांडातील लताचा स्वर हरपला आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या आठ वर्षांच्या सांगलीतील वास्तव्यातील अनेक जुन्या आठवणींनी अनेकांना गहिवरून आले. मास्टर दीनानाथ मंगेशकर 1932 मध्ये सांगलीत राहण्यास आले. त्यावेळी अवघ्या पाच ते सहा वर्षांच्या लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबीयांचे चढउतार पाहिले. तसेच सदासुख चित्रमंदिरात दीनानाथांचा गौरवकाल पाहता पाहता दारिद्रय़ाचे चटकेही सहन केले.

दिनानाथ मंगेशकरांना सांगलीतील राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी राजाश्रय दिला होता. सांगलीत नाटय़ संगीताचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे आपल्या कलेचे येथेच चीज होईल. हे लक्षात घेऊन दिनानाथांचा मुक्काम सदासुख चित्रमंदिरात तीन ते चार वर्षांचा राहीला. सांगलीच्या मुख्य बसस्थानकाजवळ त्यांनी ‘मंगेशकर चाळ’ उभी करून तेथेच आपले वास्तव्य केले. लता मंगेशकर यांनी प्राथमिक शिक्षणही सांगलीतील मारुती मंदिराजवळील तत्कलिन नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 11 मध्ये घेतले. लता यांनी शाळेतील अध्यापनापेक्षा स्वरावर लक्ष अधिक केंद्रित केले. दीनानाथांच्या बरोबरीनेच मास्टर अविनाश यांच्या तालमीत राहून आपला स्वर उंचवण्याचा प्रयत्न केला. मंगेशकर कुटुंबीयांच्या सांगलीतील या वास्तव्यात लतादीदीला आणखीन एक मोठी भेट मिळाली. ती म्हणजे 8 सप्टेंबर 1933 मध्ये त्यांच्या बहीण आशा यांचा जन्म झाला. आशाला सांभाळण्याची जबाबदारीही लतादीदींवर येऊन पडली होती.

लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबीय सांगलीत दाखल झाले त्यावेळी लतादीदींचे नाव ‘हेमा’ होते. ‘भावबंधन’ या नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका आणि मंत्रमुग्ध आवाजातील गाणी गायल्याने दीनानाथांनी हेमाचे नाव लता केले. याबरोबरच मंगेशकर यांचे आडनाव हार्डिकर असे होते. परंतु गोव्यातील जागृत देवस्थान असलेल्या मंगेशी देवीचे भक्त असलेल्या दीनानाथांनी आपल्या कुटुबीयांचे आडनाव मंगेशकर केले. त्यामुळेच हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगातील संगीताला ब्रह्मांडात स्थान देणाऱ्या लता मंगेशकर या नावाचा तेज उजळून निघाला.

पाच वर्षांच्या वयातच लतादीदी आपल्या बहिणी आशा, उषा आणि मीनासोबत संगीत आणि गायन शिकू लागल्या. लता मंगेशकर  1942 साली 13 वर्षांच्या वयात मराठी चित्रपट ‘किती हसाल’ साठी त्यांनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट प्रकाशित तर झाला; परंतु काही कारणास्तव त्यातून गाणे काढून टाकण्यात आले. या घटनेमुळे लता मंगेशकर दुःखी झाल्या. याच वर्षी हृदयविकाराने त्यांचे वडील दीनानाथ यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. त्यांचे पहिले गाणे रिजेक्ट झाल्यानंतर नवयुग चित्रपट कंपनीचे मालक आणि लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबांची जवाबदारी घेतली. याशिवाय लता मंगेशकर यांनी एक गायक आणि अभिनेत्री बनण्यासाठी देखील मदत केली. लता मंगेशकर यांनी मात्र एका मुलाखतीत आपले जन्मनाव हेमा नव्हते तर हृदया होते असे सांगितले आहे.