पोटाच्या खळगीसाठी मजुरांचे स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हडोळती

डोंगराळ व दुष्काळ तालुका अशी ओळख असलेल्या अहमदपुर तालुक्यात दुष्काळामुळे घरात आठरा विश्व दारिद्र्य, वाढलेले कर्ज घरात हाताला रोजगार नाही. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे भयावह चित्र आता दिसायला लागले आहे. चारा पाण्यासोबत हाताला काम मिळणे कठीण झाल्यामूळे परिसरातील अनेक मजूर आता काम मिळेल त्या ठिकाणी जात आहेत.

अशा गंभीर परिस्थितीत पोरींचे लग्न लावणे, लेकराबाळाचा शैक्षणिक खर्च करणे, सणावाराला कपडा लत्ता घेणे, गोडधोड करणे, अशक्य गोष्ट आहे. पाऊस नाही पाणी नाही, शेती पिकली नाही, शेतीमालाला रास्त भाव नाही या सर्वच एकंदरीत परिणाम फक्त भूकेवरच नाही सर्वव्यापी होताना दिसतो. कामे नाहीत नसल्याने हातावर पोट असलेल्याची आबाळ सुरू आहे. पोटभर खायला मिळावे ही आस बाळगत विंचवाचे बिऱ्हाड घेऊन मजूर जात आहेत. तालुक्यात व परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खरीपासोबतच रब्बी पिके ही गेली आहेत. त्यामुळे या परिसरात रोजगार उपलब्ध नाही. शेतात राबणाऱ्या या मजूराच्या हाताला काम नाही त्यामुळे या भागातील तरुण व मजूर ऊसतोडणी, डांबर काम, बांधकाम कामगार म्हणून मुंबई, पुणे, हैद्राबाद अशा विविध ठिकाणी कामासाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले आहे.

या परिसरात दुष्काळी तीव्रता अधिक गडद होत असून शेतमजूरांना रोजगार उपलब्ध नाही. मजूरावर गांव सोडण्याची वेळ आली आहे त्यामुळे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जल संधारणाची कामे हाती घेणे गरजेचे आहे. भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागेल तसेच पानंद रस्ते, सिंचन विहीरी, मजूरमार्फत शेततळे यासारखी कामे रोहयो अंतर्गत हाणे गरजेचे आहे. त्यामूळे प्रशासनाने व शासनाने हे कामे सुरू करावेत अशी मागणी होत आहे.