ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड येथील सरला नार्ंसग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. चित्रा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

चित्रा नवाथे यांचे माहेरचे नाव कुसुम सुखटणकर. गदिमांनी त्यांचे कुसुम हे नाव बदलून चित्रा असे ठेवले. दादर येथील मिरांडा चाळीत त्यांचे बालपण गेले. भवानी शंकर रोडवरील प्राथमिक शाळेत त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. पुढे चित्रा यांचा दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी विवाह झाला. 1951 मध्ये ‘लाखाची गोष्ट’ हा त्यांचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘गुळाचा गणपती’, ‘देवबाप्पा’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘बोलविता धनी’, ‘कोर्टाची पायरी’ आदी चित्रपटांत त्या नायिका होत्या. अगदी अलीकडच्या ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबम’, ‘टिंग्या’ या चित्रपटांत त्यांनी आजीच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या मुलाचे तरुण वयातच अपघाती निधन झाले होते, तर पती राजा नवाथे यांचेही 2005 साली आजारपणाने निधन झाले होते. आप्त आणि नातेवाईक असूनही चित्रा नवाथे यांनी आपला शेवटचा काळ वृद्धाश्रमात व्यतीत केला होता.

दुर्दैवी योगायोग!

चित्रा व रेखा (कामत) या दोन बहिणींनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. या दोघी बहिणींमध्ये रेखा कामत या थोरल्या तर चित्रा नवाथे या धाकटय़ा होत. दोन्ही बहिणींनी शाळेत असतानाच नृत्याचे आणि गायनाचे प्रशिक्षण घेतले होते. ख्यातनाम नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून दोघी बहिणींनी शास्त्राrय नृत्याचे धडे गिरवले. नृत्यनाटिकेमुळे दोघींना थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. दुर्दैवी योगायोग म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच तारखेला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले होते.