पुण्यातील वाघाटींना मुंबईची कूस मानवली! नॅशनल पार्कमध्ये राहून महिनाभरात वजन दुपटीने वाढले

मंगेश मोरे | मुंबई

परराज्यांतून येणाऱया नागरिकांप्रमाणेच प्राणीही मुंबईच्या वातावरणाशी कमी अवधीत जुळवून घेत आहेत. पुण्याहून बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आणलेली वाघाटीची दोन पिल्ले मुंबईच्या कुशीत चांगलीच गुटगुटीत झाली आहेत. महिनाभरातच या पिल्लांचे वजन दुप्पटीने वाढले आहे. दोन्ही नर असल्याने विशिष्ट वयात आल्यानंतर त्यांचा प्रजननासाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमधील वाघाटींची संख्या वाढणार आहे.

कोरोना महामारीमुळे नॅशनल पार्क पर्यटकांसाठी बंद आहे. लॉकडाऊनच्या या काळात नॅशनल पार्कमधील कर्मचारी-अधिकाऱयांनी प्राण्यांशी जवळीक वाढवली आहे. प्राणी आणि नागरिक यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी राज्याच्या विविध भागांत जनजागृती मोहिमा राबवल्या. याचदरम्यान मुक्त संचार करणाऱया काही बिबळ्यांना पकडून आणण्यात आले. ही मोहीम सुरू असतानाच 1 सप्टेंबरला पुण्याच्या शेतात वाघाटीची दोन पिल्ले सापडली. त्यांना तेथील वनाधिकाऱयांच्या मदतीने नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. त्यावेळी दोन्ही पिल्लांचे वजन प्रत्येकी 250 ग्रॅम होते. आता महिना पूर्ण होण्याआधीच त्यांचे वजन प्रत्येकी 525 ग्रॅम इतके झाले आहे. त्यांची पूर्ण वाढ होण्यास सव्वा वर्ष लागेल. त्यावेळी वजन दीड किलोच्या आसपास जाईल, असे नॅशनल पार्कमधील अधिकाऱयांनी सांगितले.

पुण्याहून आणलेल्या या दोन पिलांमुळे नॅशनल पार्कमधील वाघाटींची एकूण संख्या पाच होणार आहे. त्यांना प्रजनन केंद्रात वेगवेगळ्या पिंजऱयात ठेवले जाणार आहे. इच्छुक प्राणीप्रेमींना ही पिल्ले दत्तक घेता येणार आहेत.

 

पाच कर्मचारी घेताहेत पुरेपूर काळजी

वाघाटीच्या दोन्ही पिल्लांना नॅशनल पार्कातील रेस्ट हाऊस क्रमांक 8 च्या आवारात ठेवले आहे. एकूण पाच कर्मचारी त्यांचा आईप्रमाणे सांभाळ करीत आहेत. यातील दोन कर्मचारी पिल्लांना वेळच्या वेळी आहार आणि औषधे देतात. पिल्लांना एक-दोन दिवसातच चिकन द्यायला सुरुवात केली जाईल. चिकन खाण्याचा कुठला त्रास न झाल्यास त्यांना संवर्धन आणि प्रजनन केंद्रात स्थलांतरीत केले जाईल, असे सिंह विहारचे आरएफओ विजय बारब्दे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या