
>> वैद्य सत्यव्रत नानल
पावसाळा म्हटला की हिरवे डोंगर, पावसाळी सहली, थंड वारा आणि पाऊस धारा, धबधबे यासोबत गरमागरम भजी, मक्याचे कणीस, गरमागरम चहा असे सर्व आठवायला वेळ लागत नाही. पाऊस आणि सर्वत्र पसरलेले हिरवे गालिचे सर्वांना हे सर्व करायला प्रवृत्त करत असतात. अशा या पावसाळ्यात एखाद् दिवस असा उनाड, आनंदी घालवणे शक्य असले तरी शिल्लक राहते ती ऋतूनुसार रोजची जगण्याची पद्धत आणि त्याचे नियम.
आयुर्वेदाने प्रत्येक ऋतूमधे कसे जगावे, कसे वागावे, काय खावे, काय खाऊ नये इत्यादी सर्व गोष्टी ज्या माणूस रोज करतो त्याबद्दल सर्व नियम सांगितले आहेत. ते जाणून त्यांचा उपयोग करून घेणे एवढेच माणसाने केले तर आपोआपच स्वास्थ्य टिकवणे शक्य होते. चला मग पाहूया, वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यातील आहार-विहार नियम.
पावसाळ्यात पचायला गरम, हलके, स्निग्ध आणि ताजे पदार्थच खावेत. ते पदार्थ हलके आंबट, हलके खारट आणि पचायला गोड असावेत.
ज्या दिवशी कडक सूर्यप्रकाश नसेल, ढगाळ वातावरण असेल त्या दिवशी पूर्ण जेवण टाळावे. भूक लागल्यावरच खावे. अन्यथा खाऊ नये.
पावसाळ्यात सर्वात जास्त दूषित जर काही असेल तर ते म्हणजे पाणी. यातूनच सर्व साथींचे रोग पसरतात. आयुर्वेदानुसार या दिवसात निरोगी राहण्यासाठी सर्वात उत्तम पाणी म्हणजे पाण्याचा काढा. 4 लिटर पाणी मंद आचेवर उकळून आटवणे आणि 1 लिटर शिल्लक ठेवणे. हे एक लिटर पाणी म्हणजे पाण्याचा काढा. हे पाणी सहज पचते आणि पाण्यातून होणारे सर्व रोग प्रकार याप्रकारे पाणी प्यायल्याने दूर ठेवता येतात. थोडे वेळकाढू आणि कष्टाचे काम आहे. परंतु स्वास्थ्यापुढे नाही. याला एक पर्यायही आहे. तो म्हणजे 1 लिटर पाण्यात 5-5 ग्राम नागरमोथा, सुंठ, घालून 5 मिनिटे उकळणे. रात्रभर न झाकता ठेवणे आणि सकाळी गाळून दिवसभर पिणे. गरजेपुरते पिण्याचे पाणी असे बनवून वापरले तर उत्तम.
पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत. कधी खायची वेळ आलीच तर पालेभाज्या स्वच्छ करून, काडी कचरा काढावा. माती धुवावी. नंतर मिठाच्या किंवा खाण्याचा सोडा पाण्यात घालून त्यात पालेभाज्या 5 ते 10 मिनिटे भिजवाव्यात. नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात आणि मग शिजवून वापराव्यात. कच्च्या खाऊ नयेत.
पावसाळ्यात पाणी दूषित असते. मासे आणि इतर प्राणी जे मनुष्य खातो त्या सर्वांना दूषित पाण्याने अनेकविध रोग मोठय़ा प्रमाणात पावसाळ्यातच होत असतात. त्यामुळे सर्व प्रकारचा मांसाहार टाळावा असा नियम आहे.
पापड वगैरे रुचकर पदार्थ या दिवसात भाजून खावेत. तळून खाणे टाळावे.
पावसाळ्याच्या दिवसात घरात दमटपणा वाढतो. घरात तिन्ही सांजेला धूप करावा. कुणाला दम्याचा त्रास असेल तर त्याने अशावेळी घरात न थांबलेले बरे.
मध खाण्याचे सोपे नियम
दिवसभरात 2 ते 4 वेळ, 1-1 चमचा मध चघळून खावा किंवा रोज एक वेळ तरी किमान 1 ग्लास पाण्याचा काढा आणि मध 1 टेबलस्पून एकत्र करून प्यावा.
कडुलिंबाचा मध, हिरडय़ाचा मध, जंगली मध हे प्रकार पावसाळ्यात उत्तम समजावेत.
दही : पावसाळ्यात आवर्जून खावेत असे काही पदार्थ आहेत ते म्हणजे दही आणि मध. दही खाण्याचे नियम मात्र काटेकोरपणे पाळावेत. नाही तर अनेक रोगांना सामोरे जावे लागते.
ताजे दही खावे. आदमुरे दही खाऊ नये. गरम करून किंवा थंड करून दही खाऊ नये. रात्री दही खाऊ नये.
नुसते दही खाऊ नये. त्यासोबत भरपूर मध मिसळावा. दही ज्या जेवणात खाणार त्या जेवणासह साधे पाणी पिऊ नये. मुगाचे कोमट किंवा गरम गरम सूप/कढण प्यावे. अशाने खाल्लेले दही उत्तम पचते.
दह्यासोबत मांस, मासे, पालेभाज्या, मोडवलेले कडधान्य, मशरूम (अळंब्या), मुगाची खिचडी खाऊ नये. रक्तनिर्मिती प्रक्रिया खराब होऊन विविध रोग होतात असे आयुर्वेद सांगतो.


























































