बीड लोकसभेचे चित्र स्पष्ट : डॉ. प्रीतम मुंडे – अमरसिंह पंडीत आमने सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पुन्हा खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावावर शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिक्कामोर्तब केले. तर राष्ट्रवादी कडून जयदत्त क्षीरसागरांनी नकार दिल्याने अमरसिंह पंडित याची उमेदवारी निश्चित होऊ शकते, बीड लोकसभेसाठी या दोघांमध्ये थेट लढत होणार असल्याने सोशल मीडियावर दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.

बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू, जिल्ह्याचे राजकारण अतिशय स्फोटक मानले जाते. केव्हा काय घडामोडी होतील आणि याचे हादरे थेट श्रेष्ठीना सहन करावे लागतील याचा अंदाज लावणे कठीण. काल बीडमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पंकजा मुंडे, खा प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या बीड लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली, उमेदवारी बाबत शंका घेण्याचे कारणच नाही असे म्हणत दानवे यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याच दरम्यान, तिकडे मुबईत राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठकीत सर्व सरदारांनी जयदत्त क्षीरसागराच्या नावावर एकमत दाखवले मात्र जयदत्त क्षीरसागरांनीच लोकसभेसाठी नकार दिल्याने दुसऱ्या ओ बी सी चेहऱ्याचा शोध सुरू केला. ओ बी सी चेहऱ्याचा मेळ बसत नसल्याने गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या नावाची चर्चा झाली. पंडितांनी पवार साहेबांचा आदेश सरआखों पर म्हणत धनुष्य पेलण्याची तयारी दर्शवली. या राजकीय घडामोडीनंतर जिल्हाभरात सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली.