एच. आर. कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाचा महोत्सव

आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमध्ये चर्चगेटच्या एच. आर. कॉलेजचा ‘नांदी’ महोत्सव लोकप्रिय आहे. कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाचा हा प्रमुख कार्यक्रम असून येत्या 7 ते 9 जानेवारीदरम्यान महोत्सव रंगेल. यंदा ‘नांदी’चे आठवे पर्व आहे. ‘असीम निरंतरता-प्रवास बिंदूपासून अनंतापलीकडचा’ ही या वर्षीची ‘नांदी’ची संकल्पना असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे.

‘नांदी’ म्हणजे सुरुवात. नववर्षाच्या सुरुवातीला हा महोत्सव होत असल्याने याचे नाव ‘नांदी’ आहे. साहित्यिक, ललित व सादरीकरण यासाठी ‘नांदी’ महोत्सव ओळखला जातो. यंदाच्या महोत्सवात थीमनुसार नेहमीच्या स्पर्धांमध्ये ट्विस्ट आणून अनोख्यारीतीने त्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्पत्ती, उक्रांती आणि वारसा या संकल्पनेशी जोडलेली ही थीम आहे.

प्राध्यापिका डॉ. प्रियंविदा सावंत आणि विद्यार्थी अनिरुद्ध देवगिरे यांच्या प्रतिनिधीतेखाली ‘नांदी’ महोत्सवाची तयारी सुरू आहे. ‘नांदी’मध्ये कार्यक्रमाचे चार विभाग आहेत. साहित्यिक कला, ललित कला, सादरीकरण विभाग आणि अनौपचारिक. यामध्ये एका म्हणीतून कथा, वक्तृत्व, कविता लेखन आणि वाचन, आत्मचरित्र, पोस्टर बनवणे, बुकमार्क कॅलिग्राफी, फेस ऑफ नांदी, नाटक, संगीत, लावणी, फॅशन शो, लाइव्ह प्रतिमा, मोबाईल फोटोग्राफी अशा विविध स्पर्धा आहेत.

दरवर्षी स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी चित्रपट, शिक्षण इतर क्षेत्रांतले तज्ञ असतात. अनेक महाविद्यालये स्पर्धेत भाग घेतात. मागील वर्षाच्या ‘नांदी’मध्ये रुईया कॉलेजने बाजी मारली होती.