
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू. विकासाच्या आड येणारे नतद्रष्ट आम्ही नाहीत. पण मराठी माणसांचं थडगे बांधून तुमचे इमले बांधले जाणार असतील तर तुमचे थडगे बांधल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
तसेच दहशतवाद्यांना धर्म नसतो बोलताना ठिक आहे, पण मग मग रमजानमध्ये शस्त्रसंधी का केली? दुसरा मुहूर्त मिळाला नाही?, असा खणखणीत सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या देशभक्तीचा बुरखा टराटरा फाडला.
शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य निर्माण केलं. सत्तेसाठी भाजपची नीती, त्यांनी हिंदुत्वाशी केलेली तडजोड, कश्मीरमध्ये आज तोडावी लागलेली युती, बांगलादेशी हिंदू संदर्भातील येऊ घातलेलं विधेयक, राष्ट्रवादी पवारांची मराठी माणसाला तोडण्याची खेळी या सर्वांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार आसूड ओढले. आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी मुंबई तोडण्याच्या हालचाली करणाऱ्यांना देखील इशारा दिला.
जम्मू-कश्मीरच्या सरकारचा पाठिंबा भाजपने काढून घेतला, त्यांचं अभिनंदन आहे. पण जम्मू-कश्मीरचं सरकार हे नालायक आहे कळायला तुम्हाला आज तीन-साडे तीन वर्ष लागली?, त्याच्यासाठी माझ्या भारत मातेचे ६०० जवान शहीद व्हावे लागले? आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळलं ते नालायक आहेत,
असा खणखणीत सवाल त्यांनी भाजपला यावेळी केला.
आमच्याशी काडीमोड करताना विचार केला नाही. शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिदुत्व म्हणजे शिवसेना, आम्ही हिदुत्व कधी सोडलं नाही. सत्ता आली काय आणि गेली काय. गेलेली सत्ता आम्ही परत खेचून आणू, पण हिंदुत्व कधी सोडणार नाही, हे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
रमजान आला शस्त्रसंधी केली, ही काही कश्मीर सरकारनं केली नव्हती केंद्र सरकारनं केली होती. आज ज्या सरकारचा तुम्ही पाठिंबा काढला त्या सरकारनं शस्त्रसंधी नव्हती केली. कारण सैन्य केंद्र सरकारच्या अखत्यारित असतं. ईदसाठी घरी जात असलेल्या औरंगजेबला मारलं. अशा लोकांसाठी शस्त्र संधी करता. पाकिस्तान कधी नवरात्र-दिवाळी-गणपतीला शस्त्रसंधी करतं का?, असा सवाल करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मी अनेकदा सांगितलं आहे की आम्ही कुणीही गोहत्येच्या बाजूनं नाही, असू शकत नाही पण केवळ गायीला वाचवणं हे हिंदुत्व नाही. पण तो औरंगजेब हा धर्मानं मुसलमान असला तरी माझ्या देशासाठी बलिदान केलं त्या पाकड्यांना शरण न जाता त्यानं मरण पत्करलं, त्याला मुजरा करणं हे आमचं हिंदुत्व, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रावर भगवा फडकवणारच!
भगवा फडकवण्याचा निर्धार तुम्ही करून आलाच आहात. शिवसेनेचा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात करणार म्हणजे करणारच. जे कोण आव्हान देणार असतील त्यांना मी सांगतो की देऊन बघा आव्हान! तुमचं आव्हान तोडून मोडून तुमच्या छातडावर बसून माझा शिवसैनिक शिवसेनाचा भगवा फडकवेल, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी आज दिला. यानंतर शिवाजी महाराज की जय, शिवसेना झिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडलं.
मला मिस कॉलमुळे झालेले सदस्य नकोत. मला असे मिस काही नको. जे आहे ते रोखठोक, समोरासमोर पाहिजे. मर्द सैनिक पाहिजे, असा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मोदी मंगळावरती रवाना, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
मोदींच्या घरावर उडती तबकडी फिरताना दिसलं नाही, अशी बातमी होती. बरोबर आहे आता पृथ्वीवर बघण्यासारखं राहिलं नाही. त्यामुळे पुढे चार दिवसात बातमी येईल मोदी मंगळावरती रवाना, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदींचे आता परग्रहावर दौरे सुरू होतील, चार वर्ष देशात थापा मारून झाल्या आहेत आता तिथे जाऊन थापा मारतील, असेही ते म्हणाले.
जनतेसाठी आम्हाला सत्ता हवी
सत्तेच्या लालसेपायी मला भगवा नाही फडकवायचा आणि तसं मी त्याला काम सुद्धा करू देणार नाही. मला सगळं पाहिजे म्हणून मला सत्ता पाहिजे असं नाही. तर जनतेला काय पाहिजे, जनतेसाठी म्हणून मला भगवा पाहिजे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- आता शिवसैनिकांनी निर्धार करून निघालं पाहिजे, जनतेच्या मनामनात भगवा रुजवा, मग जनता म्हणेल की कुणी थापेबाज येवो आम्ही भगवाच फडकवणार
- जसं ‘संपर्क अभियान’ त्यांनी घेतलं, तसं तुम्ही सत्यशोधन अभियान करा
- सरकार जाहिरातींवर खर्च करतंय, पण तुम्ही विचारा कुणाला या योजनांचा फायदा झाला
- जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप भगवा महाराष्ट्रावर फडकेल
- पण डिसेंबरमध्ये निवडणूक घेण्याची शक्यता आहे, म्हणून पावसाळी अधिवेशन नागपूर मध्ये घेण्याचं यांनी ठरवल्याची चर्चा आहे
- नागपुरात पावसाळी अधिवेशन घेणार असाल तर विदर्भासाठी योजना आणा, तर पाठिंबा
- मराठी माणसांची थडगी बांधून तुमचे इमले उभारणार असाल तर तसं आम्ही तसं होऊ देणार नाही
- मुंबई गुजरातचं उपनगर करण्याचा यांचा डाव तर नाही ना?
- मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचं काम कोणी करणार नाही, करेल त्याचे आम्ही तुकडे करू
- मुंबईला मारून टाकण्याचं काम चाललं आहे
- त्या मुंबईतून सगळं हलवत आहे
- माझी मुंबई १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मिळवली
- बुलेट ट्रेनने कोण जाणार?
- वांझोटी स्वप्न दाखवायची आणि यांनी पुढे जायचं
- राजकारण करायचे असेल तर स्वत:ची डोके वापरा, पगडी वापरू नका
- फुले-टिळक पगडीने होत नाही, तर त्यांच्यामुळे त्या पगडीला महत्व आहे
- लोकमान्यांची पगडी नकोशी होते, पण इफ्तारची टोपी चालते
- शरद पवार मराठी माणूस फोडत आहेत
- हिरवा वरवंटा आमच्यावर येत होतो, तेव्हा शिवरायांनी एकत्र आणून तो वरवंटा तोडला
- आपली ताकद वाढली आहे, म्हणून विविध लोक आपल्याला बोलवत आहे
- ज्यांनी ज्यांनी शिवसेनाप्रमुखांविरोधात राजकारण केलं त्यांना राजकारणात आडवं कसं करायचं ते मी दाखवून देतो
- त्यांनी पुंग्या वाजवायच्या आणि आम्ही डोलवायच्या असं होणार नाही
- आधी इथल्या देशातल्या हिंदूंचे प्रश्न सोडवा, आम्ही विकतचं दुखणं का घ्यायचं
- हे विधेयक भाजप घेऊन येणार असेल तर शिवसेना खासदार विरोध करतील
- असं करायचं असेल तर आधी कश्मीरमध्ये हिंदूंना राहण्याचं का करत नाही?
- अमित शहा आले म्हणाले एक विधेयक आणतो, बांगलादेशमधले हिंदू इथे आणायचे आहेत पण त्या हिंदूंना ओळखणार कसं
- पीडीपीशी युती तोडली, म्हणून मी भाजपचं अभिनंदन करतो, आता तुम्ही पाकिस्तानला चिरडून टाका तर तुम्हाला डोक्यावर घेऊ
- पाकड्यासमोर शरण न जाता मरण पत्करलं त्याला आम्ही मुजरा
- दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणता मग रमजानमध्ये शस्त्रसंधी का केली?
- देव-देश-धर्म संभाजी महाराजांनी कधी सोडलं नाही
- अशी तडजोड मी केली तर शिवराय आणि शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाही
- गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही
- माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी मला भगवा फडकवयाचा आहे
- मोदींच्या घरावर तबकडी फिरताना दिसली, आता बातमी येईल मोदी परग्रहावर रवाना कारण आता तिथे थापा मारायच्या आहेत
- ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्याच्या छातडवर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेल
- भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे
- मला असे सैनिक सदस्य नको
- काल बातमी वाचली, एअरटेलला कॉल करून भाजपचा सदस्य झाला
- मिस कॉलवरून मला सदस्य नको, अजिबात नको
- मी पहिली सही केली
- आजच्या दिवशी आपण सदस्य नोंदणी सुरू केली आहे
- तमाम शिवसैनिक जिद्दीला पेटला आहे
- भगवा फडकवणारच हा निश्चय करून पुढे जायला पाहिजे
- येत वर्ष निवडणुकांच आहे
- भिऊ नको आम्ही सोबत आहोत असं बोलणारी माणसं आहेत ती जपायची आहे
- जिंकलो म्हणून माजलो नाही, आणि हरलो म्हणून थांबलो नाही
- गेली ५२ वर्ष असंख्य शिवसैनिकांनी अपार मेहनत घेतली, कष्ट केले




























































