Lok sabha 2019 : विखे-पाटलांच्या राजीनाम्याची बोंब

सामना ऑनलाईन  । मुंबई

विरोधी पक्षनेते काँगेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची आवई पुन्हा एकदा उठली, मात्र आपण राजीनामा दिलेला नाही असा खुलासा विखे-पाटलांनी केला.

नगरमधील उमेदवारीसाठी सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत आले आहेत. विरोधी पक्षनेत्याचा मुलगा भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा निवडणूक प्रचार कसा करणार, असा प्रश्न काँग्रेसमधून विचारला जात होता. मध्यंतरी विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. माझे वडील बाळासाहेब विखे-पाटील आता हयात नाहीत. त्यामुळे निवडणुकीचा संदर्भ घेऊन हयात नसलेल्या व्यक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलायला नको होते अशा शब्दांत विखे-पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.