केंद्रीय तपास संस्थांना निवडणुकांपर्यंत रोखा; तृणमूल काँग्रेस शिष्टमंडळाचे निवडणूक आयोगाला आवाहन

ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि एनआयए यांसारख्या केंद्रीय तपास संस्थांना लोकसभा निवडणुका होईपर्यंत भाजपचे विरोधक असलेल्या तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांचे उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यापासून रोखण्याची विनंती आज तृणमूलच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली.

डेरेक ओब्रायन, डोला सेन, साकेत गोखले आणि सागरिका घोष यांचा समावेश असलेल्या टीएमसी नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि विरोधी पक्षांविरुद्ध भाजपकडून केंद्रीय एजन्सींचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करणारे निवेदन सादर केले.

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना सरसकट समान संधी मिळावी यासाठी ईडी, सीबीआय, आयटी विभाग आणि एनआयएच्या संचालकांची बदली करण्याचे आवाहनदेखील या शिष्टमंडळाने आयोगाला केले.

कारवाई सत्ताधारी पक्षाच्या इशाऱयावर

काल इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये केंद्रीय एजन्सीद्वारे अभूतपूर्व आणि पक्षपाती कारवाई केल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत सातत्याने वाढ होत आहे. आणि हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या इशाऱयावर केले जात आहे. राज्य सरकारचे अधिकारी बदलले जातात आणि केंद्रीय एजन्सीमधील एकाही अधिकाऱयाची बदली का होत नाही, अशी विचारणा खासदार साकेत गोखले यांनी केली.