Lok Sabha election 2024 : धनंजय मुंडे यांच्या उद्योगांची यादी काढली तर त्यांना फिरणे मुश्कील होईल, शरद पवार यांचा इशारा

ते सध्या माझ्यावर आणि कुटुंबावर वैयक्तिक हल्ले करत आहेत. धनंजय मुंडे यांनी केलेले उद्योग मी सध्या सांगू इच्छित नाही. त्यांना कशाकशातून बाहेर काढलंय याची जर यादी काढली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी सोडून अजित पवार गटात गेलेल्या धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मोजक्याच शब्दांत त्यांनी समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की, मी त्यांना उत्तर देणार नाही. ज्यांचं नाव तुम्ही घेता त्यांची लायकी नाही. लहान कुटुंबातला, लहान समाजाला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती. लोकांची नाराजी होती तरीही जबाबदारी दिली. तेच आता माझ्यावर व्यक्तिगत आणि कुटुंबावर हल्ला करत आहेत. आज त्यांच्याबद्दल मी शेवटचं बोललो. त्यांच्यावर यापुढे भाष्य करणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

पुलोदचं सरकार स्थापन केलं तर संस्कार म्हणायचे आणि दादाने केलं तर गद्दारी म्हणायची. हे दादांनी एकटय़ाने केलं नाही… असंख्य जणांनी केलं. लोकशाहीचा निर्णय होता. 2014 मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादाने केलं गद्दारी आहे. 2017 मध्ये गणेश चतुर्थीला एक बैठक झाली.. कुठे? कशी बैठक झाली? दिल्लीला कुणाच्या घरी बैठक झाली? शिवसेनेला कसं बाजूला काढायचं हे कसं ठरलं? त्या बैठकीचे व्हिडीओ देऊ शकतो. तुम्ही केलं ते संस्कार आणि आम्ही केलं तर गद्दार? असं धनंजय मुंडे म्हणाले होते.