Lok Sabha Election 2024 : अधिकार, हक्क, मनासारखा लोकप्रतिनिधी निवडून देणाऱया बोटावरच्या शाईची कथा

लोकसभा असो, विधानसभा असो की, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो… मतदान करताना डाव्या हाताच्या तर्जनीवर चढणारी निवडणुकीची शाई बनवण्याचे काम कर्नाटकच्या म्हैसूर येथील म्हैसूर पेंटस् ऍण्ड वार्निश लिमिटेडकडून 1962 पासून आजपर्यंत एकहाती सुरू आहे. मतदारांना अधिकार, हक्क आणि मनासारखा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे काम ही शाई करत आहे. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर 1952 साली देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीने लोकशाहीची प्रक्रिया खऱया अर्थाने सुरू झाली. मात्र, निवडणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी 1962 पासून डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्याची पद्धत सुरू झाली. ही शाई बनवण्याचे काम म्हैसूर पेंटस् ऍण्ड वार्निश लिमिटेड ही देशातील एकमेव कंपनी करते.

30 हून अधिक देशांमध्ये निर्यात

देशात निवडणुकीसाठी वापरली जाणारी ही शाई इंग्लंड, तुर्कस्तान, मलेशिया, नेपाळ, घाना, दक्षिण आफ्रिका, डेनमार्कमधील निवडणुकीतही ही शाई वापरली जाते. जगात सुमारे 60 हून अधिक देशांतही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निर्यातीची मोठी ऑर्डर कंपनीकडे आहे. कंबोडिया, फिजी, सिएरा लियोन, गिनी, मंगोलिया या देशांमधूनही मागणी आली आहे, अशी माहिती कंपनीचे महासंचालक मोहम्मद इरफान यांनी दिली.

कृष्णराज वाडियार यांनी म्हैसूर पेंट्सची केली स्थापना

म्हैसूर पेंट्सची स्थापना 1937 साली महाराजा कृष्णराज वाडियार (चतुर्थ) यांनी केली. केंद्रीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाने कंपनीबरोबर 1962 साली सामंजस्य करार केला. सेंटर फॉर साइंटिफिक ऍण्ड इंडस्ट्रिअल रीसर्चने या शाईचा फार्म्युला तयार केला होता.

शाई अशी बनते

निवडणुकीसाठी बनवलेल्या या शाईत सिल्व्हर नायट्रेट असते. शाईचा फार्म्युला फक्त व्यवस्थापकाकडे असतो. त्यामुळे बाजारात या शाईची एकाधिकारशाही आहे. बोटावर लागल्यानंतर तब्बल 10 दिवस ही शाई बोटावर असते. त्यानंतर हळूहूळ ती उतरत जाते. सुरुवातीला काचेच्या बाटलीतून उपलब्ध होणारी शाई आता प्लॅस्टिकच्या बाटलीतून मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिली जात आहे.