
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. सवर्णांच्या आरक्षणाच्या विधेयकावर मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री गहलोत यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले. या चर्चेदरम्यान एक रोमांचक घटना घडली. सवर्णांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणावर चर्चा सुरू असताना काळही थांबला होता.
LIVE : सवर्ण आरक्षणाला शिवसेनेचे समर्थन – आनंदराव अडसूळ
गहलोत यांनी संसदेत विधेयक मांडल्यानंतर यावर चर्चा रंगली. काँग्रेस खासदार व्ही थॉमस या विषयावर बोलत असताना लोकसभेत रोमांचक घटना घडली. सवर्णांच्या आरक्षणावरील चर्चा पाहण्यासाठी काळही थांबला होता. संसदेतील एका सदस्यांना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना संसदेतील घड्याळ बंद पडल्याचे निदर्शनास आणून दिले. घड्याळात 5 वाजून 10 मिनिटं झाली होती, याच वेळेवर ते बंद पडले. यानंतर महाजन यांनी घड्याळ सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी महाजन यांनी ‘माझे घड्याळ सुरू असल्याने चिंता करू नका’, असे म्हणत चर्चा सुरू करण्यास सांगितले आणि संसदेतील गंभीर वातावरणात हास्यतरंग उमटले. तर काहींनी विरोध केला असता महाजन यांनी त्यांना चहा पिऊन या असा कडक सल्लाही दिला.





























































