समुद्रसखा

213

>> शैलेश माळोदे

डॉ. एम. राजीवन. समुद्र विज्ञानतज्ञ. उर्जा आणि प्यायचे पाणी या दोन्ही गरजा समुद्र सहज भागवू शकतो.

जैविक आणि अजैविक साधनं विकासासाठी शाश्वत रीतीनं वापरणं महत्त्वाचं आहे. सागरी संपत्तीचा विचार करता ते खूप महत्त्वाचंदेखील आहे. ऊर्जा आणि स्वच्छ पेयजल ही दोन प्रमुख साधनं आपणास उपयुक्त असून त्यासाठी महासागर हा प्रमुख स्त्रोत ठरू शकतो. आज स्वच्छ, हरित आणि पुनर्नवीकरणक्षम ऊर्जेची गरज सर्वांच्या लक्षात आलेली आहे. त्यासाठी महासागराकडून सर्व प्रकारच्या पुनर्नवीकरणक्षम ऊर्जेच्या प्रकारांचा वापर होऊ शकतो. त्यासाठी सागरी प्रवाह आणि लाटा, महासागरी औष्णिक ऊर्जा रूपांतर आणि किनाऱयावरून वाहणारे जोरदार वारे या सर्व पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर निसारीकरण म्हणचेच डी- सॅलिनेशनद्वारे सागरी पाण्याचं गोडय़ा पाण्यात रूपांतर करून किनारी प्रदेशातील पाण्याची गरज भागवली जाऊ शकते. डॉ. एम. राजीवन यांच्या वाणीतून भराभर शब्दसमूह बाहेर पडत सागरी लाटांप्रमाणे माझ्यावर आदळत होते. डॉ. एम. राजीवन हे हिंदुस्थान सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव असून देशाचे एक वरिष्ठ ‘ओशनोग्राफर’ म्हणजे समुद्रविज्ञान तज्ञ आहेत.

माधवन नायर राजीवन अर्थात डॉ. एम. राजीवन यांचा जन्म 27 जुलै 1961 रोजी झाला. खरं तर शिक्षणाने ते भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांनी त्याच विषयात एम. एस्सी. आणि पीएच.डी. केलीय. वातावरणशास्त्र, हवामानशास्त्र, मान्सून हे त्यांच्या आवडीचे आणि संशोधनाचे विषय असून ते हवामान शास्त्रज्ञ म्हणूनच संशोधन क्षेत्रात ओळखले जातात. हवामान बदल आणि हवामान बदलाशी निगडित अतिरेकी घटना अर्थात एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, मान्सूनमधील बदल, त्याविषयीचा अंदाज, मेघांचं शास्त्र (क्लाऊड सायन्स) या क्षेत्रात त्यांचं प्रावीण्य असून सध्याच्या संशोधनाचा विचार करता हवामान बदलाशी निगडित विविध घटना, मान्सूनचा अंदाज, पाऊस, उष्णतेच्या लाटा याबाबत त्यांचं संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर या सर्व क्षेत्रांचा अंतर्भाव असलेल्या केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव म्हणून ते प्रशासनिक जबाबदारी आणि धोरणकर्त्यांना सल्ला देण्याचं कार्य असं दुहेरी कर्तृत्व गाजवत आहेत.

‘‘डिसेंबर 1983 मध्ये मी टीआयएफआरमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम सुरू केलं. 1985 ते 2008 या काळात मी हिंदुस्थानच्या हवामान खात्यात अहमदाबाद आणि पुण्यात कार्यरत होतो. मी हिंदुस्थानच्या हवामान केंद्राचा संचालक होतो’’, असं डॉ. राजीवन यांनी सांगितल्यानंतर माझ्या 2003 साली आकाशवाणीच्या सॉफ्टवेअर प्लॅन स्कीमअंतर्गत निर्मित ‘वारियाची वार्ता’ या मालिकेची आठवण मला झाली. 2008 ते 2012 या काळात डॉ. एम. राजीवन अवकाश खात्यात राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेत वरिष्ठ शास्त्रज्ञ होते (सायंटिस्ट ‘एफ’). 2012 ते 2015 या काळात ते केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयात सायंटिस्ट ‘जी’ आणि सल्लागार होते. ‘‘मी 2015 साली मार्चमध्ये पुण्याला परतलो ते हिंदुस्थानचे उष्णदेशीय हवामान शास्त्र अर्थात आयआयटीएमचे संचालक म्हणून, परंतु 7 डिसेंबर 2015 ला लगेच मला दिल्लीला परतावं लागलं, मंत्रालयाचा सचिव म्हणून.’’ डॉ. एम. राजीवन यांच्याशी हवामानविषयीचे लेख वा कार्यक्रम निर्माण करताना ते संबंध आले, त्यातून उलगडत गेलं त्यांचं साधं, परंतु पक्कं व्यक्तिमत्त्व. सचिव म्हणून चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊनदेखील देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी नवी धोरणं राबविण्यातील त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.

‘‘जर्नल ऑफ क्लायमेटमध्ये प्रकाशित ‘नेट क्लाऊड रेडिएटिव्ह फोर्सिंग ऍट द टॉप ऑफ ऍटमॉस्फीअर इन द एशियन मान्सून रिजन’ या माझ्या शोध निबंधासाठी मला 2008 साली START यंग सायंटिस्ट पुरस्कार प्राप्त झाला. मला माझ्या शोधनिबंधासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्याविषयी मला आनंद आहे. संशोधन क्षेत्र माझं मूळ क्षेत्र आहे. सचिव पदाची प्रशासकीय जबाबदारी अनुषांगिक आहे. मी रमतो संशोधनात आणि केवळ संशोधनात. परंतु माझं उत्तरदायित्व मी कधीच झटकत नाही’’ असे सांगताना डॉ. राजीवन यांचा स्वर थोडा कडक झाला होता.

डॉ. एम. राजीवन इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमी (इन्सा), नासीचे (नॅशनल सायन्स ऍकॅडमी ऑफ सायन्स) फेलो आहेत. त्याचबरोबर जागतिक हवामान संघटनेच्या हवामानशास्त्र आयोगाचे वरिष्ठ तज्ञ सल्लागारदेखील आहेत. 2018 साली केरळमध्ये आलेल्या प्रलयकारी पुराविषयी विश्लेषण करताना त्यांनी स्वतःच्या मूळ राज्यातील यंत्रणेनं हवामान खात्यानं पुराच्या दोन दिवस आधी दिलेल्या इशाऱयाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल परखडपणे सुनावलं होतं. ते याविषयी म्हणतात, “केरळात देशातील सर्वाधिक पाऊस पडत असला तरी तिथे पुराविषयी पूर्वसूचना देणारी प्रभावी प्रणाली नव्हती. एकूण देशामध्येच विविध अत्याधुनिक टूल्सद्वारे अतिरेकी हवामान घटनांविषयी अंदाज घेता येणं शक्य असलं तरी पुरेशी यंत्रणा नाही, ज्यायोगे त्यांना प्रभावीरीत्या वापरणं शक्य व्हावे. हिंदुस्थानमधील घटकांचं व्यवस्थापन विज्ञानाधिष्ठत नसून योग्य माहितीद्वारे निर्णय घेण्याऐवजी एकटय़ा दुकटय़ा व्यक्तीवर सर्व निर्णय सोपवलेले असतात. केरळसारख्या अतिवृष्टीची घटना हवामान बदलाच्या जागतिक संकटाचा एक भाग असून ती देशात इतरत्र कुठेही घडू शकते, जशी ती महाराष्ट्र आणि कर्नाटकात यंदा घडली.’’ थोडक्यात, हवामान बदलाचं वास्तव लक्षात घेऊनच आपण आपलं जगणं ठरवायला हवं हा मथितार्थ डॉ. एम. राजीवन यांच्याशी झालेल्या चर्चेचा आणि संशोधनाचा असून त्यावर आपण पुढे वाटचाल करायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या