आता प्रत्येक अपघाताचे होणार विश्लेषण, चार जिह्यांत राबवणार पायलेट प्रोजेक्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्ते अपघात आणि त्यात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आता प्रत्येक अपघाताचे विश्लेषण केले जाणार आहे. विश्लेषणामुळे नेमके अपघाताचे कारण स्पष्ट होईल. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पायलेट प्रोजेक्टला लवकरच सुरुवात होणार आहे.

देशात रस्ते अपघातात मृत्यू होण्याची संख्या वाढत चालली आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने त्या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. नेमके अपघाताचे कारण शोधत गोल्डन अवर्स मध्ये जखमीला किती वेळात रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला किती वेळात उपचार मिळाले याची माहिती घेत त्यावर उपाय योजना करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये पायलेट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे.

पायलेट प्रोजेक्ट बाबत नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक झाली. त्यानुसार महाराष्ट्रात पायलेट प्रोजेक्ट साठी नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. आयआयटी मद्रासचे प्राध्यापक स्वामिनाथन यांच्याकडे स्वरूप ठरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रोजेक्टमध्ये पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि परिवहन विभाग एकत्र काम करणार आहेत.

”चार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण 25 टक्के आहे. नेमके अपघाताची कारण शोधून तेथे जनजागृती करणे आणि बेशिस्त चालकावर कारवाई केली जाईल. त्या चार जिल्ह्यामध्ये अपघाती मृत्यूदर कमी करण्यावर भर दिला जाईल.” – डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक, महामार्ग पोलीस.

  • 2018 मध्ये पुण्यात 1257 गंभीर अपघातात 1,329 जणांचा मृत्यू.
  • 2019 मध्ये नाशिकमध्ये 518 गंभीर अपघातात 557 जणांचा मृत्यू.
  • 2019 मध्ये शहरी भागात सायंकाळी 6 ते 9 या काळात 593 गंभीर तर ग्रामीण भागात 1,594 गंभीर अपघाताची नोंद.
  • 2019 मध्ये खुल्या परिसरात 6,242 तर निवासी भागात 3,468 अपघात झाले. रस्त्याचा विचार केला तर 2019 मध्ये सरळ मार्गावर 9,162 उड्डाण पुलावर 272 आणि खड्यामुळे 66 आणि रस्त्याची काम सुरु असताना 283 गंभीर अपघात झाल्याची नोंद.