मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांच्या राजीनाम्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा मुख्य सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला असताना निरगुडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने त्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.

मराठा आरक्षणाच्या विषयात महत्त्वाची भूमिका निभावणाऱया राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा यापूर्वी ऍड. बी. एस. किल्लारीकर आणि प्रा. लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वरून निरगुडे यांच्या राजीनाम्याची माहिती जाहीर केली. निरगुडे यांनी 4 डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने 9 डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला? त्यांच्यावर कोणता दबाव होता, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. यायबाबतची माहिती सभागृहाला कळली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य मागासवर्ग आयोग हा ओबीसींच्या रक्षणासाठी आहे. हा आयोग स्वायत्त असून तो संख्येने 52 टक्के असलेल्या इतर मागासवर्गांच्या हक्कांचे संरक्षण करतो. अशा स्वायत्त आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देण्याआधी तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. आमच्यावर दबाव टाकून आमच्याकडून काम करून घेतले जात आहे, अशी माहिती सदस्यांनी दिली आहे. त्यामुळे वेगळय़ा पद्धतीने काम करून घेण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता याबाबत सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

यावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर अथवा सदस्यांवर राजीनामा देण्यासाठी कुणाचाही दबाव नव्हता. त्यांनी तसे कुठेही म्हटलेले नाही. तथापि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी राजीनामा का दिला याची कारणे जाणून घेऊन सभागृहाला माहिती दिली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी राज्य सरकारच्या वतीने सांगितले.

सुनील शुक्रे नवे अध्यक्ष
राज्य मागासवर्ग आयोगात मागील काही दिवसांपासून सदस्यांचे राजीनामा सत्र सुरू होते. आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनीही तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबतची माहिती उघड होताच राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करत माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी तर सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती केली आहे.

आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी वैयक्तिक कारणास्तव 4 डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. निरगुडे यांचा राजीनामा 9 डिसेंबरला स्वीकारण्यात आला. यापूर्वी आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. संजीव सोनवणे ऍड. बालाजी किल्लारीकर आणि प्रा. लक्ष्मण हाके यांनी सदस्यपदाचा राजीनाम दिला होता. राज्य सरकारने आज मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करत आयोगातील रिक्त पदे भरत नव्या सदस्यांची नियुक्ती केली.