
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱयावर होते. या दौऱयात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ‘सदिच्छा’ भेट घेणे क्रमप्राप्त होते. मात्र शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा शिंदे यांनी केला असला तरी नड्डा आणि शहा यांच्या भेटीचे मग प्रयोजनच काय होते, असा सवाल राजधानीतील प्रसारमाध्यमांना पडला आहे. आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची मुंबईत चर्चा सुरू होईल असे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी मागणीही आपण निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे शिंदे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनीच शिंदे यांना भाजप नेत्यांच्या घरी पोहचवले.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत माजी मुख्य सचिव जयंत बाठीया आयोगाचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे यावर 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.




























































