
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेच्या अंतर्गत महाराष्ट्रात दोन कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याने यादीवरील दावे-हरकती दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र पाठवून केली आहे.
महाराष्ट्रात एसआयआर मोहिमेअंतर्गत 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदारांपैकी 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे म्हणजेच 21.14 टक्के मतदार प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा. सुनावणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची मागणी केली आहे.
दावे-हरकतींसाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर हा कालावधी अपुरा असून याच काळात गणेशोत्सव असल्याने अनेक नागरिक गावी जातात. त्यामुळे दावे आणि हरकती दाखल करण्यासाठीची मुदत 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवावी, अशी मागणी अॅड. कोंडविलकर यांनी केली आहे.



























































