महाराष्ट्र एकीकरण समितीचा ‘चलो मुंबई’ नारा, 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिरच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय करत आहे. याविरोधात महाराष्ट्र सरकारने आक्रमक होणे अपेक्षित आहे. पण महाराष्ट्रातील राज्यकर्ते आमच्याकडे दुर्लक्ष करत असून सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन कामकाजालाही म्हणावी तशी गती येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती मनोहर किणेकर यांनी यावेळी दिली.

सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, यशवंत बिर्जे, बी. डी. मोहनगेकर यांचीही यावेळी भाषणे झाली. त्यांनीही ‘चलो मुंबई’ आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

17 जानेवारीला हुतात्म्यांना अभिवादन

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी अभिवादन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 17  जानेवारी रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना बेळगाव हुतात्मा चौक आणि पंग्राळी खुर्द येथील हुतात्मा चौकात अभिवादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत घटक समित्यांनी बैठका घेऊन निर्णय घ्यावा, असे सुचवण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी मराठा मंदिर येथे जाहीर सभा आयोजित करण्याचाही निर्णय झाला.

कोल्हापूरला सीमा परिषद

दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे कोल्हापूर येथे सीमा परिषद आयोजित करणार आहेत. त्यासंदर्भात एक शिष्टमंडळ लवकरच त्यांची भेट घेणार आहे, अशी माहितीही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आली.