
राज्यामध्ये दुसऱया टप्प्यामध्ये पोलीसभरतीची प्रक्रिया राबविली जाणार असून, त्यामध्ये 7200 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात 87 पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेण्यात आली असून, नगर जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांचा यामध्ये समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गृहमंत्री वळसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली. नगर जिह्यात 500 पदे रिक्त आहेत. त्यास मंजुरी मिळावी. तसेच नगर जिह्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या पोलीस वसाहतींचा निर्णय घेऊन त्यांना घरे द्यावीत. काही पोलीस ठाण्यांच्या इमारतीच्या बांधकामासाठीही त्यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांचे लक्ष वेधले. नगर जिल्ह्यात एकापेक्षा अनेक गुन्हे करणाऱया गुन्हेगारांची माहिती ‘टू प्लस’ योजनेद्वारे संकलित केली आहे. ई-टपालची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, अनेक प्रलंबित गुह्यांचा निपटारा केला जात असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, ‘राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पोलीसभरतीची प्रक्रिया राबविली होती. यामध्ये पाच हजार 700 पदे भरलेली होती. आता दुसऱया टप्प्यात सात हजार 200 पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्यभरात 87 पोलीस ठाण्यांच्या इमारतींची नव्याने बांधकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये नगर जिह्यातील राहुरी, नेवासा व पाथर्डी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद होईल. मार्चनंतर नव्याने घरबांधणीची कामे मार्गी लागतील. नगर जिह्यातही पोलिसांचा घरांचा प्रश्न मार्गी लागेल,’ असे त्यांनी सांगितले.
































































