महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? आज निर्णय!

राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतरही नागरिकांचा सुरू असलेला स्वैर संचार आणि यामुळे रुग्णसंख्येत सतत होणारी वाढ याचे तीव्र पडसाद आज मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. कोरोना संसर्गाची साखळी कोणत्याही परिस्थितीत रोखायची असेल तर कडक लॉकडाऊन हवा यावर मंत्रिमंडळाचे एकमत झाले. महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय होणार काय, याचे उत्तर उद्याच मिळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी याबाबत घोषणा करतील, असे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले.

आवश्यक सुविधा उभारता येतील

राज्यात ऑक्सिजनचा साठा अपुरा पडत आहे. 300 मेट्रिक टन ऑक्सिजन बाहेरून आणण्याची वेळ आली आहे. त्या राज्यांतही कोरोना वाढतोय. त्यामुळे फार भीषण परिस्थिती निर्माण होईल. म्हणून कठोर लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. या काळात राज्याला स्वतःचे ऑक्सिजन प्लाण्ट उभे करता येतील. त्याचप्रमाणे परिस्थिती नियंत्रणात आणता येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यात जिल्हाबंदीची शक्यता

कोरोना निर्बंधातही लोक अनावश्यक बाहेर फिरतात. त्यामुळे किमान 10 ते 15 दिवसांचा तरी कडक लॉकडाऊन असावा अशी आग्रही मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्हांतर्गत प्रवासबंदी तसेच लोकल प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

परदेशातून लस खरेदी करणार

कोरोना रोखण्यासाठी राज्यात लसीकरणाची मोहीम जोरात राबविण्यात येईल. 18 ते 45 या वयोगटात अधिक लसीकरण करण्यासाठी वेळ पडल्यास कोविशिल्ड, कोवॅक्सिनव्यतिरिक्त फायझर, स्पुटनिक तसेच मॉडर्नसारख्या लसी परदेशातून मागविण्याबाबतही सरकार विचार करीत आहे. यासाठी निधी कमी पडू न देता लसीकरण अधिक सक्षमपणे राबविण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या