
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली. तसेच आगामी काळात पक्षबांधणीच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी पदाधिकाऱयांना देण्यात आल्या.
नगर शिवसेनेची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, जि.प. सदस्य संदेश कार्ले, नगरसेवक संजय शेंडगे, गणेश कवडे, संतोष गेनाप्पा, राम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, अशोक बढे, योगीराज गाडे, दत्ता सप्रे, भाकरे तसेच महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, संजय छजलानी, प्रताप गडाख, प्रताप भोसले, सुनील लालबोंद्रे, प्रकाश भंडारी, संदीप दातरंगे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी शिवसेनेची भूमिका पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर मांडली. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर भाष्य करत शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहायचे असून, आपल्याला आता कायद्याची लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी जे काही फॉर्म भरून द्यायचे आहेत, ते शिवसैनिक आणि पदाधिकाऱयांनी भरून द्यावेत, असे सांगत आपण उद्धवसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे दाखवून देऊ, असे आवाहनही कोरगावकर यांनी केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी आपण एकदिलाने उद्धवसाहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले.
जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, शिवसेनेची ताकद मोठी असून, आपल्याला आता पक्षबांधणीच्या दृष्टिकोनातून एकदिलाने काम करायचे आहे. योग्य नियाजन करून पुढे जायचे असून, पक्षवाढीसाठी सगळ्यांनी एकदिलाने काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्याला उद्धवसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे. ते जे आदेश देतील त्याचे काटेकोर पालन करायचे आहे. आगामी काळात मोठय़ा प्रमाणात सदस्य नोंदणी करायची आहे. पक्ष मजबूत करायचा आहे, असे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.


























































