मतदानाच्या दिवसापर्यंत तरी उमेदवार जाहीर करा; नाशिकच्या जागेवरून भुजबळांचा महायुतीला टोला

महाराष्ट्रात जागावाटपात आणि प्रचारात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मात्र, महायुतीचे घोडे पाच जागांवर अडले आहे. या जागांवरून माघार घेण्यास कोणीही तयार नसून या जागांचा तिढा वाढतच आहे. वाद असलेल्या जागांमध्ये नाशिकच्या जागेचाही समावेश आहे. या नाशिकच्या जागेवरून अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी महायुतीलाच टोला लगावला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. तर महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या जागेवर अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपने दावा केला आहे. तसेच माघार घेण्यास कोणीही तयार नसल्याने या जागेवरील तिढा वाढतच आहे.

शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी छगन भुजबळ देखील इच्छुक होते. मात्र, उमेदवारी घोषित होत नसल्याने त्यांनी अखेर माघार घेतली. मात्र, तरीही अजित पवार गटाने नाशिक जागेवर दावा सोडलेला नाही. भाजपची नाशिकमध्ये ताकद आहे, असे सांगत भाजपनेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा वाढतच आहे.

जागावाटपाच्या या तिढ्यावरून छगन भुजबळ यांनी महायुतीलाच टोला लगावला आहे. मला वाटले माझ्यामुळे जागावाटपाची अडचण होत आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतली. तरीही जागावाटप होऊन उमेदवार घोषित झालेला नाही. आता उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. 20 मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.