महाराष्ट्रात महायुतीच्या 48 नाही तर 50-60 जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा टोला

लोकसभेची निवडणूक जवळ आली असतानाच विविध पक्षांकडून दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीच्या नेत्यांनी दर्पोक्ती करत महायुतीला 48 पैकी 45 जागा मिळतील, असा दावा केला आहे. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीच्या नेत्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

वाघोली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालयात शिवसैनिकांच्या भेटीला दानवे आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज असल्याने जनतेत आक्रोश आहे. सर्वसामान्य माणसाला अधिकारी वर्गाने धारेवर धरले आहे. अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्येची जाण असते. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही. तर देशात मोदी कसे हरेल ते बघत राहा, असेही ते म्हणाले. महायुतीला 48 पैकी 45 जागा मिळतील, असे त्यांचे नेते म्हणत आहेत. मात्र, महाराष्ट्रातून महायुतीच्या 48 नाही तर 50-60 जागा निवडून येतील, असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदे सरकारने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना फसवले. त्यामुळे मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. तीन पक्ष असूनही त्यांना उमेदवार मिळत नसल्याने इतर पक्षातील उमेदवार आयात करावे लागत आहेत, असेही दानवे म्हणाले.