
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आज सलग युक्तिवादाचा तिसरा दिवस होता. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जबरदस्त युक्तिवाद करत पक्षाची बाजू मांडली. यावेळी न्यायालयानं राज्यपालांनी राजकीय आखाड्यात उतरू नये असे म्हणत राज्यपालांचे कान टोचले. तसेच सत्ता संघर्षाचं हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे कळवळून विनंती केली की नबाम राबिया हे अरुणाचलमधील प्रकरण भविष्यातही अशा प्रकारच्या सत्ता संघर्षाच्या वेळी सुनावणीसाठी आधार म्हणून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे याचा पुर्नविचार करण्यात यावा आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात यावं अशी विनंती केली. यानंतर यासंदर्भातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं निकाल राखून ठेवला.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा विषय घटनात्मक असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर त्यावर सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला हा विषय तीन न्यायमूर्तींच्यापुढे होता. त्यानंतर आता सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठासमोर आहे. ज्या आठ मुद्दय़ांवर सत्तासंघर्षाची पूर्ण सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये नबाम राबियाचा जो मुद्दा होता ती केस मागच्यावेळी घटनापीठाने ऐकला होता. आता सुद्धा त्याच मुद्दय़ावर न्यायालयात खल सुरू असून त्यामध्ये असलेल्या त्रुटी गेले दोन दिवस ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी घटनापीठापुढे मांडलेल्या आहेत. आता प्रश्न हा आहे की, मागच्यावेळी पाच न्यायमूर्तींचे जे काही जजमेंट होते आणि आता मांडलेल्या गोष्टी यामधील कोणते इंटरपीटेशन लागू करायचे. ज्यावेळी अशा प्रकारची गुंतागुंत निर्माण होते, त्यावेळी ते वरच्या घटनापीठाकडे पाठवणे गरजेचे आहे. त्यानुसार हे प्रकरण सात न्यायमूर्तींचे घटनापीठ तयार करून त्याकडे ते पाठविण्यात यावे, अशी मागणी आम्ही आहे. ज्या बाजू आम्ही न्यायालयासमोर ठेवल्या आहेत. त्याचा विचार करता मागणीला योग्य न्याय मिळेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.




























































