शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसानभरपाई, महाविकास आघाडीचे विधान भवन परिसरात जोरदार आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र त्याच्या तुलनेत त्यांना जाहीर करण्यात आलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. सरकारने अशी तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर झाला असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली.

राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या अस्मानी संकटावर सभागृहात चर्चा झाली. त्यावर सोमवारी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली, मात्र ही नुकसानभरपाई पुरेशी नसल्याची टीका करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आंदोलनात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, रवींद्र वायकर, रवींद्र धंगेकर, राजन साळवी, प्रज्ञा सातव सहभागी झाले होते.

कायदा-सुव्यवस्था बिघडली

राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. त्याचबरोबर फलक उंचावून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘इक्बाल मिर्चीसोबत कुणाचे व्यवहार’, कोणता मंत्री ड्रग माफियाचा साथीदार’, ‘महिला असुरक्षित तरुण बेरोजगार, असे फलक यावेळी फडकवले.