राज्यात महाविकास आघाडी 50 टक्क्याहून जास्त जागा जिंकणार; शरद पवार यांचा विश्वास

भाजपाचा 400 पारचा नारा हा अतिशय चुकीचा आहे. देशामध्ये लोकसभेच्या जागा 544 आहे, जर त्यांनी त्या सर्व येणार असे म्हणले असते तर आपण मान्य केले असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे भाजपला लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 50 टक्क्याहून अधिक जागा या निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने चारशे पाच चा नारा पंतप्रधानांनी दिला आहे, याबाबत विचारल्यानंतर शरद पवार यांनी हा नारा मला चुकीचा वाटतो देशांमध्ये लोकसभेच्या 544 जागा आहेत त्यांनी त्या सर्व जिंकणार असे म्हटले असते तर ते एक वेळा मान्य केले असते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांनी दहा वर्षे काय केले, असा सवाल केला. यावर बोलताना शरद पवार यांनी ते प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीची टीका करतात वास्तविक पाहता ते दहा वर्षात सत्तेवर आहे ,त्यांनी काय केले हे सांगितले पाहिजे ,अशी आपली भावना आहे. मी ज्यावेळेला सत्तेमध्ये केंद्रामध्ये होतो त्यावेळेला काय केलं आहे, हे जनतेला माहित आहे असे ते म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून सिंचन घोटाळ्याचा विषय पुन्हा काढला. त्यावर विचारले असता शरद पवार यांनी सिंचन घोटाळा व राज्य सहकारी बँक याच्या घोटाळ्यासंदर्भामध्ये या अगोदर सुद्धा त्यांनी आरोप त्यांनी केला होता. पंतप्रधानांनी हा आरोप नेमका कोणासाठी केला याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे ते कोणाबद्दल बोलले हे त्यांनी स्पष्ट करावे. वेळप्रसंगी त्याची चौकशी करावी, पण आपल्या माहितीप्रमाणे ज्यांच्यावर आरोप आहे त्यांनाच ते घेऊन राज्यभर फिरत आहे, असा टोला त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला आहे. सत्तेचा वापर कशा पद्धतीने केला हे आता कोणाला सांगायची गरज राहिलेली नाही, भाजपाने ईडी, सीबीआयसारखी यंत्रणा वापरली त्यातून अनेक कारनामे पुढे आले. याच ईडीमुळे दोन राज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. त्यामुळे सत्तेचा वापर हा त्यांनी कशा पद्धतीने केला, हे आता सांगणे गरजेचे नाही, असेही ते म्हणाले.

आम्ही नंतर पर्याय देणार
देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढताना जशी राज्यांमध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली तशी राज्यांमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली. अगोदर एकत्र येऊन निवडणुका लढवू लोकांना स्थिर सरकार देऊ आणि नंतरच आपण इतर बाबींचा विचार करू असा निर्णय घेऊन आम्ही ही आघाडी स्थापन केली आहे. त्याची वाटचाल योग्य दिशने होत असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

आम्ही विधानसभेला जास्त जागा घेऊ
राज्यामध्ये महाविकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे. राज्यामध्ये लोकसभेच्या आम्ही एकत्रितपणे जागा लढवत असून एक दोन जागेचा विषय सोडला तर सर्व ठिकाणी आम्ही एकत्रितपणे निवडणुका या लढवत आहोत. आमच्यामध्ये एकवाक्यता कायम आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कमी जागा घेतल्या आहेत त्या जाणीवपूर्वक घेतलेल्या आहेत असे त्यांनी सांगून विधानसभेसाठी आम्ही अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आम्हाला प्रामाणिक कार्यकर्ते उभे करून निवडणूक आम्हाला लढवण्याचा विचार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

50 टक्क्यांपेक्षाही अधिक जागा मिळतील
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवीत आहेत अजून निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. महाविकास आघाडीला राज्यांमध्ये अनुकूल असे वातावरण असल्याचे शरद पवार यांनी सांगून या अगोदर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चार काँग्रेसला एक व एमआयएमला एक अशा विरोधकांना जागा होत्या. यावेळी मात्र तसेच चित्र राहणार नाही, 50 टक्के जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा दावा ही शरद पवार यांनी केला आहे.

धनगर आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकारच जबाबदार
राज्यामध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे बारामती मध्ये येऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आता ते उपमुख्यमंत्री आहेत. दहा वर्षे उलटले तरी मात्र त्यांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही. वास्तविक पाहता धनगर समाजाला सवलती मिळण्याचा अधिकार आहे जो शब्द दिलेला होता तो शब्द पाळला गेलेला नाही. वास्तविक पाहता यांची राज्यात व देशांमध्ये सत्ता असताना त्यांनी धनगर समाजाला न्याय द्यायला पाहिजे होते. या समाजाला मुंबई न्यायालयामध्ये व आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा न्याय मिळालेला नाही याला जबाबदार हे सरकार असल्याचाही आरोप शरद पवार यांनी केला आहे.

गडकरींच्या मतदारसंघात मतदान कमी
उन्हामुळे मतदारांची संख्या कमी झाली असेल. मात्र, पहिल्या टप्प्यांमध्ये जे राज्यात मतदान झाले ते पाहता भाजपाचे नितीन गडकरी यांच्या मतदारसंघांमध्ये कमी मतदान झाले मतदारांची उदासीनता दिसून येते असे शरद पवार म्हणाले.

मैदान बदलू पण विचार महत्त्वाचे
बारामतीला शेवटची सभा शरद पवार हे घेतात. मात्र या ठिकाणी अजित पवार यांनी मैदान अगोदरच आरक्षित केलेले आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले त्यांनी मैदान आरक्षित केले असले तर आपण दुसऱ्या दिवशी सभा घेऊ. गरज भासल्यास मैदान बदलू. मैदानाने काही फरक पडत नाही विचार महत्त्वाचे आहे अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला.

आम्ही दोन आठवडे वाट पाहू
नगर जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचे संकट आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा अतिशय गंभीर झाला आहे. सरकारने याकडे गांभीरणी लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही दोन आठवडे पाहू. यंत्रणेने या सुविधा द्याव्यात नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

आरक्षणाबाबत मांडली भूमिका
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय विचारल्यानंतर शरद पवार यांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी नेहमीच कटुता येऊ नये म्हणून बोलत नाही. समाजामध्ये कशा पद्धतीने सामंजस्य राहील हे मी नेहमी पाहतो. अशा मुद्द्यांमुळे अनेक घटक यातून दुरावले जातात कटुता निर्माण होते, ती होता कामा नये असे सांगून आरक्षणाच्या बाबतीत जे सत्तेमध्ये आहेत केंद्र सरकार यांनीच यामध्ये लक्ष घातले पाहिजे. मात्र, यांनी आरक्षणाबाबत घोषणा करायच्या पण अंमलबजावणी करायची नाही हे योग्य नाही असेही ते म्हणाले.

विखे नेमक्या कोणत्या पक्षात
विखे यांनी शरद पवारांवर टीका केली, यावर विचारले असता शरद पवार यांनी त्यांच्या टिकेला फार महत्त्व द्यायचं नसतं. त्यांच्यावर मी बोलणार नाही, त्यांचे पराक्रम मला माहिती आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच ते आता कोणत्या पक्षात आहेत, असे विचारलं तर शेजारी जिल्हाध्यक्ष फाळके यांनी ते भाजपमध्ये आहे असे सांगितल्यावर हास्यकल्लोळ झाला.