दारूच्या नशेत असलेल्या वाहनचालकाने मोटारसायकलला धडक दिल्याची घटना आज पहाटे माहीम परिसरात घडली. या धडकेत मोईन अन्सारीचा जागीच मृत्यू झाला तर नबा शेख ही गंभीर जखमी झाली आहे. अपघातप्रकरणी मोहम्मद आमीर जावेद शेख आणि डरयास सॅम जिजिनाला माहीम पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
इस्माईल शेख हे व्यावसायिक असून मोईन अन्सारी हे त्याचे मेहुणे आहेत. आज पहाटे मोईन अन्सारी हे नबा शेख हे माहीम कॉजवे येथून जात होते. दारूच्या नशेत असलेला मोहम्मद आमीर हा वाहन चालवत होता. तर डरयास हा त्याच्या बाजूला बसला होता. नशेत असलेल्या आमीरने मोईनच्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेने मोटारसायकलच्या मागे बसलेली नबा ही काही अंतरावर जाऊन पडली, तर मोईन हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच स्थानिक रहिवासी गोळा झाले. तेव्हा दारूच्या नशेत असलेला डरयास हा नागरिकांना धमकी देत होता. अपघाताची माहिती समजताच माहीम पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मोईन आणि नबाला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मोईनला मृत घोषित केले, तर जखमी नबावर उपचार सुरू आहेत.
































































