लहान मुलीचा जबरदस्ती चुंबन घेणे लैंगिक अत्याचारच; मुंबईतील पॉक्सो न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहान मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेणे ही प्रेमाची कृती नसून लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने नोंदवले. याप्रकरणी न्यायालयाने 50 वर्षीय कंत्राटदाराला 10 हजार रुपये दंड आणि पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडित मुलीला पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. विशेष न्यायाधीश ऋचा खेडेकर यांनी हा निकाल दिला.

काय आहे नेमकं प्रकरण?

3 मार्च 2025 रोजी पीडित चार वर्षाची मुलगी आपल्या आईच्या पुढे चालत मंदिराच्या दिशेने जात असताना आरोपीने तिला पकडले. आरोपीने मुलीची मान आणि हात पकडून तिला जबरदस्तीने चुंबन घेतले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने तिच्या गालावर आणि मानेच्या मागील बाजूस चावा घेतला. या प्रकारामुळे मुलगी रडू लागली. मुलीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याने केवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण ही कृती केल्याची दावा केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तीवाद अमान्य केला. ओळखीच्या व्यक्तीने मुलीला उचलून घेणे किंवा प्रेमाने चुंबन घेणे आणि अनोखळी व्यक्तीने मुलीला जबरदस्तीने पकडून चुंबन घेणे या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच पीडित मुलगी केवळ चार वर्षांची असली, तरी तिची साक्ष अविश्वसनीय ठरवता येणार नाही, असे नमूद करत, मुलीची साक्ष आणि प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती यांच्यातून फिर्यादी पक्षाने आरोप सिद्ध केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आरोपीला पकडणारा स्थानिक नागरिक, तपास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आठ साक्षीदार तपासले. बचाव पक्षाने खोट्या आरोपांचा दावा केला. मात्र बचाव पक्ष आपला दावा सिद्ध करू न शकल्याचे न्यायालयाने नमूद केले.