देना बँकेवर दरोडा टाकणारे चिल्लर चोर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महेश्वरी उद्यान येथील देना बँकेवर दरोडा टाकून सोळा हजार सातशे रुपयांची चिल्लर चोरून पसार झालेल्या तिघांच्या माटुंगा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्या चिल्लर चोरांकडून पोलिसांनी 11 हजारांची चिल्लर जप्त केले आहेत.

महेश्वरी उद्यान येथे देना बँकेची शाख आहे. 1 फेब्रुवारी रोजी बँकेच्या टॉयलेटच्या खिडकीतून चोरटे आत घुसले होते. चोरांनी बँकेतील लॉकर खोलण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना तिजोरी खोलता आली नाही. त्यामुळे तेथे ड्राव्हरमध्ये एक रुपयाच्या नाण्यांनी भरलेल्या सहा पिशव्या घेऊन चोरटे पळाले होते. त्या पिशव्यांमध्ये 16 हजार सातशे रुपये होते. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे, पोलीस निरीक्षक पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय अंबरगे, उपनिरीक्षक खरमाटे व पथकाने तपास सुरू केला. बँकेतील सीसीटीव्हीत आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील दुकानदारांना याबाबत सावध करून कोणी नाणी घेऊन दुकानात आल्यास तत्काळ पोलिसांना संपर्प करण्याचे आवाहन केले होते. अखेर आरोपींनी तीच चूक केली आणि ते लटकले. बँकेतील चिल्लर चोरून पसार झालेल्या काशीनाथ पेंढारकर, चेतन कायतडके आणि प्रसन्ना बंद्रे या तिघांना पकडून चोरीतील 11 हजारांची चिल्लर हस्तगत केली.

दारूसाठी चिल्लरचा वापर
वडाळ्याच्या बंगालीपुरा परिसरात राहणारा काशीनाथने बराच वेळा दारू घेण्यासाठी चिल्लरचा वापर केला होता. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी काशीनाथला पकडले. काशीनाथने चोरीची कबुली देत अन्य चेतन व प्रसन्ना या साथीदारांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही पकडले. आरोपींकडून 11 हजार रुपये किमतीची नाणी हस्तगत करण्यात आली.