
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोपा प्रकरणात (cash for query) आचार समितीने गुरुवारी अहवाल सादर केला होता. चर्चेनंतर हा अहवाल आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांना मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महुआ मोईत्रा लोकसभेमध्ये पैसे घेऊन प्रश्न विचारतात असा आरोप दुबे यांनी केला होता आणि चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आचार समितीने चौकशीअंती 500 पानांचा अहवाल सादर केला होता आणि त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली होती. आचार समितीने सादर केलेल्या या अहवालावर शुक्रवारी चर्चा झाली. चर्चेवेळी टीएमसी, काँग्रेस आणि विरोधी खासदारांनी महुआ मोईत्रा यांना बोलण्याची संधी देण्याची मागणी केली. मात्र भाजप खासदारांनी विरोध केल्यामुळे सभापतींनी ही मागणी फेटाळली आणि मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया मोईत्रा यांनी दिली आहे. आपल्या निलंबनानंतर सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका करताना मोईत्रा म्हणाल्या की, संसद हे कांगारू कोर्ट झालं आहे. ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे. जर मला गप्प बसवून अदानीच्या मुद्द्याला दाबून टाकण्याचा विचार मोदी सरकार करत असेल, तर या कांगारू कोर्टाने सगळ्या देशाला फक्त व्यवस्थेचा दुरुपयोग कसा केला जातो हे दाखवून दिलं. अदानीसाठी हा दुरुपयोग किती महत्त्वाचा आहे आणि एका महिला खासदाराला कोणत्या पातळीपर्यंत त्रास दिला जाऊ शकतो, हेच दाखवून दिलं, अशी तिखट प्रतिक्रिया मोईत्रा यांनी दिली आहे.
























































