मोदी मंत्रिमंडळात उलथापालथ, केंद्रीय मंत्री मुरुगन यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतचोरीचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात रान उठवले असतानाच दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. मोदी मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ सुरू असून आज आणखी एक मंत्री एल. मुरुगन यांनी अचानक राजीनामा दिला. मुरुगन हे माहिती व प्रसारण राज्यमंत्री होते. त्यांच्या राज्यसभा सदस्यपदाचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

मुरुगन यांनी राजीनामा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. मी तामिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी अधिक वेळ देऊ इच्छितो, असे मुरुगन यांनी या पत्रात म्हटले आहे. तामिळनाडुतील रहिवासी असलेले मुरुगन हे मध्य प्रदेशातून 2021पासून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते.

राज्यसभेवर कोणाची वर्णी

दिवाळीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात अनेकांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांनीही राज्यसभेतील आपला कार्यकाळ संपल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यावरही त्यांना पुन्हा राज्यसभेवर अद्याप संधी दिलेली नाही.