
मालवणी येथील ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या काळे गँगला मालवणी पोलिसांनी गजाआड केले. राजा काळे, संतोष काळे आणि शिवम पवार ऊर्फ कोळी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तिघांच्या अटकेने 13 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मालवणी परिसरातील एका ज्वेलर्सवर काहीजण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव याच्या पथकातील पोलीस निरीक्षक बिले, उपनिरीक्षक संदीप वत्रे आदीच्या पथकाने मालवणी येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. तर दोन जण पळून गेले आहेत. राजा, संतोष आणि शिवम हे तिघे गुजरात येथील रहिवासी असून ते चोया करण्यासाठी मुंबईत येतात. पूर्वी ही टोळी मोफत रेशन, सोने देऊ असे सांगून वृद्धांना टार्गेट करायची. या टोळीविरोधात मुंबई, ठाणे,नवी मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत. राजा हा मुख्य सूत्रधार असून तो त्याच्या नातेवाईकाच्या मदतीने काळे गँग चालवतो. त्याच्याविरोधात 25 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून पोलिसांनी दरोडय़ाचे साहित्य जप्त केले आहे. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































