फिरण्याचा बहाणा करून करायचे घर साफ; मुंबई, ठाणे, पुण्यात करायचे चोऱ्या 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत फिरण्याचा बहाणा करून घर साफ करणाऱया दोघांना मालाड पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथून अटक केली. शाकिब शौकत अली अन्सारी आणि आहिल हारून चौधरी ऊर्फ टुकटुक अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून अडीच लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत.

मालाड येथे राहणाऱया महिला गेल्या महिन्यात कामावर गेल्या होत्या. अज्ञात चोरटय़ाने त्याच्या घरातून अडीच लाखांचे दागिने चोरून पळ काढला होता. या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला.वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शरद जाधव, उप निरीक्षक शिवाजी शिंदे, बोधे, फर्नांडिस, चुंगीवडियार, वाघ, पाईकराव, महाडिक, मोनिका गोम्स याने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी 50हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱयाची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना शाकिब दिसला. शाकिबवर येरवडा आणि चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्यावरून तपासाची चक्रे फिरली.

शाकिब हा उत्तर प्रदेशच्या बिजनोर येथे असल्याचे समजताच शिंदे यांचे पथक तेथे गेले. गावाबाहेर शाकिब हा दारू पीत बसला होता. पोलिसांना पाहताच तो पळून जात होता. पाठलाग करत असतानाच शिंदे हे देखील जखमी झाले. जखमी अवस्थेत देखील शिंदेंच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असता पोलिसांना आहिलची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक दिल्ली येथे गेले. दिल्ली येथे फिल्डिंग लावून आहिलला ताब्यात घेतले. त्याने ते अडीच लाखांचे सोने एका सोनाराकडे दिले होते. त्या दोघांना अटक करून मुंबईत आणले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

फेसबुकवर झाली ओळख 

शाकिब हा पूर्वी बेकरीचे तर आहिल हा स्पेअर पार्ट्सचे काम करायचा. फेसबुकवर त्यांची ओळख झाल्यावर ते एकत्र नशा करू लागले. नशेची सवय लागल्यानंतर ते चोऱया करण्यासाठी दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथून एक्सप्रेसने मुंबई, ठाणे, पुण्यात येतात.

रेकी करून करतात चोरी 

शाकिब आणि आहिल हे फिरण्याचा बहाणा करून ते दोघे रेकी करतात. उत्तर प्रदेशला जाण्याच्या दिवशीच ते हातसफाई करतात. शाकिब आणि आहिल हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.