बनावट प्रोफाईल बनवून प्रेयसीला केलं ब्लॅकमेल, प्रियकराच्या आवळल्या मुसक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाच्या जमान्यात फेक प्रोफाईलचा सुळसुळाट झाला आहे. कोणती प्रोफाईल खरी आणि कोणती खोटी हे ओळखणं सध्या कठीण झालं आहे. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अशीच एक घटना राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात घडली आहे.

एका तरुणाने आपल्याच प्रेयसीला बनावट अकाउंट बनवून ब्लॅकमेल केल्याची घटना राजस्थानच्या अजमेर येथे घडली आहे. प्रेयसीने वेळीच पोलीस स्टेशन गाठल्याने या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

अजमेर येथे राहणाऱ्या प्रिया (नाव बदललेले) हिचे मुकुल उर्फ मकबूल याच्याशी प्रेमसंबंध होते. त्याने तिच्या फोनमधून मेमरी कार्ड काढून ते कॉपी करून ठेवलं होतं. त्याआधारे त्याने तिचे फोटो एका बनावट अकाउंटवरून तिलाच पाठवले. ते फोटो कुटुंबाच्या हाती लागू नयेत म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली.

यानंतर प्रियाने मुकुलची भेट घेतली आणि त्याला याबाबत सांगितलं. तिला पोलिसांकडे जाण्याची इच्छा होती. मात्र, आपलं भांडं फुटण्याच्या भीतीने त्याने तिचं मन वळवलं आणि ब्लॅकमेलरला पैसे देण्यास सांगितलं. तिने याला होकार दिला आणि मुकुलकडेच पैसे देऊन त्याला ब्लॅकमेलरला ऑनलाईन पद्धतीने पैसे देण्यास सांगितलं. मुकुलने ते पैसे घेतले आणि तिला खोटा फोटो बनवून पैसे पोहोचल्याचं सांगितलं.

पहिल्यांदा हा बेत यशस्वी झाल्याने मुकुलची हिंमत वाढली. त्याने पुन्हा नवीन फोटोंसह तिच्याकडे 26 हजार रुपयांची मागणी केली. पण, यावेळी मात्र प्रियाने मुकुलला कोणतीही कल्पना न देता सरळ पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी इन्स्टाग्राम आयडी शोधून मुकुलला बेड्या ठोकल्या.