पैसे मागितल्याने पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला, शनिवारवाडा परिसरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणीपुरी खाल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे दोघा गुडांनी पाणीपुरी विक्रेत्यावर चाकुने वार केल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय 22, रा. मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्रसिंग हा शिवाजी रस्त्यावर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. दोन दिवसांपूर्वी दोघेजण रिक्षातून शनिवारवाडा परिसरात आले. त्यांनी राजेंद्रसिंगकडून पाणीपुरी घेतली. काहीवेळानंतर त्याने दोघांना पाणीपुरीचे पैसे मागितले. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी त्याच्यावर चाकुने वार केले. त्यानंतर शिवीगाळ करुन दोघे जण रिक्षातून पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.