
सामना प्रतिनिधी । मुंबई
दारूच्या नशेत तर्रर्र केल्यानंतर मित्राचा चाकूने गळा चिरून पुण्याला पळून गेलेल्या आरोपीला ऍण्टॉप हिल पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता त्याला 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पैशाच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा असली तरी कारण वेगळेच असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
आनंद नारायणन (50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आनंद ऍण्टॉप हिलच्या पँटा गॅलेक्सी इमारतीत पत्नी व मुलीसोबत राहत होता. आनंदचे कुटुंबीय गावी गेल्याने घरात कोणीच नव्हते. सोमवारी रात्री आनंद हा त्याचे मित्र सारंग पाथरकर आणि तंबी यांच्यासोबत बाहेरून दारू पिऊन घरी परतला. तिघेही आनंदच्या घरी गेले. घरात गेल्यानंतर सारंगने पुन्हा आनंदला दारू पाजली. आनंद पूर्ण नशेत असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तेव्हाच सारंगने सोबत आणलेल्या चाकूने त्याचा गळा अक्षरशः चिरला.
त्यानंतर सारंग आणि तंबी यांनी तेथून पळ काढला. सारंगने मुंबई सोडून थेट पुणे गाठले, तर तंबीने घटनास्थळावरून ऍण्टॉप हिल पोलीस ठाणे गाठून आनंदच्या हत्येची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गुह्याचा तपास सुरू केला. आनंदची हत्या त्याचाच मित्र सारंग याने केली असून तो पुण्याला पळून गेल्याचे समजताच पोलिसांनी पुणे गाठून पुणे पोलिसांच्या मदतीने सारंग पाथरकरला ताब्यात घेतले. आनंद आणि सारंग यांनी पार्टनरशिपमध्ये परळ येथे म्हावरा बकरा नावाने हॉटेल सुरू केले होते, पण त्यात नुकसान होऊ लागल्यावर त्यांनी ते हॉटेल बंद केले. त्यानंतर आनंदने शिवाजी पार्क येथे एकटय़ाने हॉटेल सुरू केले होते. पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद होताच, पण आणखी एका कारणावरून त्यांच्यात त्या दिवशी खटका उडाला आणि हत्येची घटना घडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
वरद राजनच्या बहिणीचा मुलगा
90 च्या दशकातला माटुंग्याचा दादा असलेला वरद राजन मुदलियार याच्या बहिणीचा आनंद मुलगा होता. आनंदने याआधी विविध वृत्तपत्र व टीव्ही चॅनेलमध्ये काम केले होते. अलीकडे त्याने सारंगच्या सोबतीने हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता.

























































