Murder – लग्नाचा तगादा लावला म्हणून गर्लफ्रेंडची हत्या, दगडाने ठेचला चेहरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गर्लफ्रेंड सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने वैतागलेल्या एका तरुणाने तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिची ओळख पटू नये म्हणून त्याने तिचा चेहरा दगडाने ठेचला. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह त्याने दरीत फेकून तेथून पळ काढला. हा भयंकर प्रकार पालघरमधील वाघोबा घाटात घडला आहे.

कॅरोल मिसक्विट्टा (28) असे त्या तरुणीचे नाव असून ती विलेपार्ले भागात आई वडिलांसोबत राहायची. कॅरोल ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे झिको मिसक्विट्टा (27) नावाच्या तरुणासोबत अफेयर होते. कॅरोलने झिकोच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र झिको लग्नासाठी एवढ्यात तयार नसल्याचे तिला सांगायचा. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते.

24 जानेवारी रोजी कॅरोल डॉक्टरकडे जाऊन येते सांगून घरातून निघाली. त्यानंतर ती व झिको तिच्या बाईकवरून पालघरच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागून त्याचा मित्र कुमार देवेंद्र देखील दुसऱ्या बाईकवरून येत होता. बाईकवर असतानाही तिचे व झिकोचे लग्नावरून भांडण झाले. त्यानंतर वाघोबा घाटात झिकोने बाईक थांबवली व तिच्या मानेवर धारदार सुरा फिरवला. झिको कॅरोलची हत्या करायच्या उद्देशानेच आला होता. झिकोने तिची हत्या केल्यानंतर त्याने व कुमारने मिळून तिचा चेहरा दगडाने ठेचला. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह घाटातल्या दरीत फेकून दिला व ते दोघे घरी परतले.

कॅरोल रात्री उशीरा घऱी न परतल्याने तिच्या आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर जेव्हा कॅरोलचा काहीच पत्ता नाही लागला त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान नुकताच कॅरोलचा मृतदेह वाघोबा घाटात पोलिसांना आढळून आला. कॅरोलचा चेहरा ठेचलेला असल्याने तिच्या आई वडिलांनी तिच्या कपड्यांच्या आधारे तिची ओळख पटवली.

कॅरोलच्या आई वडिलांनी झिकोवर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी कॅरोलचा मृतदेह सापडला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात कॅरोल झिकोसोबत बाईकवरून जात असताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी झिकोला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.