
हॉटेलचे भाडे भरण्यासाठी ऑफिसमधील सहकारी तरुणीचे पैसे आणि मालकाचे एटीएम कार्ड चोरी करणाऱयाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. विपुल विलास प्रधान असे त्याचे नाव आहे. नोकरीच्या पाचव्याच दिवशी त्याने चोरी केली होती. चोरीच्या गुह्यात त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विपुल हा मूळचा मुंबईचा रहिवासी आहे. घरभाडे न भरल्याने त्याला सदनिका खाली करावी लागली होती. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबीयांना घेऊन अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये राहिला होता. हॉटेलचे बिल 60 हजार रुपये झाल्याने त्याला बिलाबाबत वारंवार विचारणा होत असायची. बिल कसे भरायचे असा त्याच्यासमोर प्रश्न होता. गेल्या महिन्यात विपुल हा अंधेरी एमआयडीसी येथे एका ऑफिसमध्ये कामाला राहिला. नोकरीच्या पाचव्या दिवशी तो ऑफिसमध्ये बसला होता. तेव्हा त्या ऑफिसमध्ये अकाउंट विभागात काम करणाऱया तरुणीने तिच्या वडिलांच्या कामासाठी 1 लाख 20 हजार रुपये काढून आणले होते. ते पैसे आणि मालकाचे एटीएम तिने ऑफिसच्या कपाटात ठेवून ती जेवायला गेली. हीच संधी साधत विपुलने कपाटातील 1 लाख 20 हजार रुपये चोरून पळ काढला.
दुसऱया दिवशी ऑफिसचे मालक यांना कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्यामुळे त्याने महिलेकडे एटीएम कार्डची मागणी केली. तेव्हा तिला त्या कपाटात पैसे आणि एटीएमचे पाऊच जागेवर दिसले नाही. त्यामुळे मालकाने तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा चोरीचा प्रकार समोर आला. चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
पुण्यातून केली अटक
वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकातील सहायक निरीक्षक कुणाल मोहिते, चव्हाण, नलावडे, जाधव याने तपास सुरू केला. पोलीस पकडतील म्हणून विपुलने तो नंबर बंद केला होता. तो पुण्यात राहत असल्याचे समजताच पोलिसांनी तेथून विपुलला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर विपुलने चोरीची कबुली दिली. चोरीच्या पैशातून त्याने हॉटेलचे बिल आणि उधारीचे पैसे दिल्याचे तपासात समोर आले.































































