मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृत प्रेयसीवर झालेल्या  अन्यायाच्या विरोधात न्याय मिळू न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या एका व्यक्तीने आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयात सुरक्षा जाळी बसविण्यात आल्याने सुदैवाने गंभीर प्रसंग घडला नाही. पोलिसांनी या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेतले.

आपल्या मृत प्रेयसीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळावा यासाठी बीड जिह्यातल्या आष्टी तालुक्यातील पारगावचा 43 वर्षीय तरुण बापू नारायण मोकाशे याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयात दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली.

2018 मध्ये त्याच्या प्रेयसीवर अत्याचार झाला. त्यानंतर त्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली, मात्र या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला नाही. त्यामुळे आरोपींची सुटका झाली. प्रेयसीवर झालेल्या अत्याचाराची दाद मागण्यासाठी त्याने सरकारला पत्र दिले होते.

आरोपींना अटक व्हावी यासाठी त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर बापू मोकाशे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्याची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या मोकाशे याने थेट सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याचे सांगण्यात येते.

मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. मोकाशे या जाळीवर येऊन जोराने आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्यावर छोटीशी दुखापत झाली. जखमी मोकाशे याची जाळीमधून सुटका करून त्याला उपचारासाठी जी. टी. रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.