तेथे कर माझे जुळती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेघडंबरी प्रत्यक्ष ज्या चौथऱयावर आहे त्याच मंचावर कार्यक्रमाची तयारी झाली. बाबासाहेबांसाठी खुर्ची मांडली होती. ते म्हणाले, ‘‘ही खुर्ची काढा, मी खाली बसणार. या चौथऱयावर आसनावर बसण्याचा अधिकार हा फक्त महाराजांचाच’’

ही गोष्ट आहे जानेवारी 2004 मधली. काहीतरी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करावा असं मनात आलं. पार्ल्यात काही कामानिमित्त दीनानाथ नाटय़गृहात जात असता, पार्लेश्वर मंदिराच्या नाक्यावर माझा एक मित्र भेटला – संतोष जोशी. तत्कालीन हॉटेल रुची सागर (आताचे ‘मी मराठी’) येथे आम्ही चहा घेत बसलो होतो. माझ्या मनातला हा विचार संतोषकडे बोलून दाखवला, पण काय करायचं सुचत नव्हतं. आम्ही चहा मागवला. चहाचा शेवटचा घोट घेतला आणि एक फोटो क्लिक व्हावा तशी चटकन् एक कल्पना सुचली. किल्ले रायगडावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना घेऊन ‘शिवकल्याण राजा’ हा कार्यक्रम सादर करायचा. संतोषला कल्पना भयानक आवडली व आम्ही हा कार्यक्रम एकत्रितपणे करण्याचे ठरले. मग तयारी लगेच सुरू करायची नक्की झालं. तारीख तिथल्या तिथे ठरवली 3 व 4 फेब्रुवारी 2004. आम्ही दोघेही तिथून तडक निघालो ते आमचा मित्र सुबोध जोशी (गुलमोहोर ट्रव्हल्स) यांच्या ऑफिसला. सुबोधला भेटून या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. तोही खूश झाला. मग काय, लगेच रायगडावर जाण्याचा बेत ठरला. सुबोधच्याच ऑफिसमधून शिवशाहीर बाबासाहेबांना मी फोन लावला. त्यांचे स्वीय सचिव कै. प्रतापराव टिपरे यांनी फोन उचलला. बाबासाहेबांना संकल्पना सांगितली, … त्वरित होकार (बघतो, सांगतो, कळवतो हे त्यांच्या शब्दकोशातच नव्हते) बाबासाहेबांच्या होकारानंतर दुसरा फोन केला तो पं. हृदयनाथ मंगेशकर यांना. ‘बाबासाहेब हो म्हणल्यानंतर माझा नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही.’  झालं… दोन महत्त्वाचे होकार पदरी पडले होते.

ताटं, वाटय़ा, चमचे, गाद्या, जेवणाची भांडय़ांपासून ते वाद्य, ध्वनिक्षेपक यंत्रणा, दिवे, फुलं, सारं काही पायथ्यावरून रायगडाच्या राजसभेत हजर केलं. कार्यक्रमाचा दिवस उजाडला… पुण्यातून बाबासाहेब, मुंबईहून संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाले. रोप-वेने ही सर्व मंडळी गडावर आली. दिवसा आराम झाल्यावर रात्री प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ जवळ आली. बाबासाहेबांना रोप-वेच्या बेस कॅम्पपासून राजसभेत नेण्याकरिता डोलीची व्यवस्था केली होती व तशी त्यांना विनंतीही केली; परंतु त्यांनी त्यास साफ नकार दिला व स्वतः चढून राजसभेत पोहोचले. त्यावेळी ते मिश्किलपणे म्हणाले, ‘‘माझं वय अवघं 82 वर्षांचं आहे.’’ छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी प्रत्यक्ष ज्या चौथऱयावर आहे त्याच मंचावर कार्यक्रमाची तयारी झाली होती. बाबासाहेबांना बसण्याकरिता एक खुर्ची मांडली होती. ते शब्द आजही माझ्या कानात घुमतायत – ‘‘ही खुर्ची काढा, मी खाली बसणार. या चौथऱयावर, आसनावर बसण्याचा अधिकार हा फक्त महाराजांचाच’’ हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. कार्यक्रम सुरू झाला. बाबासाहेब शिवचरित्र कथन करीत होते, एकामागून एक गाणी सादर होत होती, समोर फुलांनी सजलेल्या राजसभेत जमलेला प्रचंड जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता. जसजशी रात्र होत गेली, तशी थंडी प्रचंड वाढत गेली. पं. हृदयनाथजींसह सर्व वादक व इतर गायकांच्या शाली, स्वेटर्स, ग्लोव्हज् अंगावर चढत गेले; परंतु फक्त एका व्यक्तीला या बोचऱया थंडीचा स्पर्शही झाला नव्हता. शिवप्रेमाने भारावून अंगात महाराजांचं वारं आल्यागत बाबासाहेब शिवचरित्र कथन करीतच होते. हे पाहून माझ्यासह सर्व कलाकार व जमलेले श्रोते स्तब्ध झाले. कार्यक्रम संपला.

दुसरा दिवस उजाडला…

बाबासाहेब ठरलेल्या वेळेवर तयार होऊन, जगदीश्वराचे दर्शत घेऊन महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचले. रात्रीच्या जागरणाचा त्रास नाही, थकवा नाही की थंडीने बेजार झालेलं अंग नाही. त्याच उत्साहात बाबासाहेबांनी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी रायगड किल्ल्याची माहिती व महात्म्य सांगितले. शेवटी त्यांनी गडाचे रचनाकार हिरोजी इंदुलकर यांचा कोपऱयात असलेला शिलालेख दाखवला व आजची पिढी इथे येऊन स्वतःची नावं खडूने लिहून हे आपलं वैभव कसं कलुषित करतात याची खंत व्यक्त केली. व्याख्यान आटोपलं. दुपारची जेवणं झाली. बाबासाहेब पुण्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले. जाताना गाडीत बसण्यापूर्वी मला जवळ बोलावून घेतले. माझा हात हातात घेतला व म्हणाले, ‘‘अद्भुत कार्यक्रम केलात मंदारराव. न भूतो न भविष्यति!’’ आणि आशीर्वाद देऊन गाडीने निघाले.

मला मात्र आनंदाश्रू आवरेनात. तेव्हा मला पटले, ‘‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती.’’

n मंदार कर्णिक, स्वरगंधार