
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अवनी वाघिणीला गोळ्या घालण्याचे आदेश देणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना वनमंत्र्यांच्या पदावरून हटवावे अशी मागणी केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यांनी अवैध पद्धतीने अवनी वाघिणीला मारण्याचे आदेश दिले. या वाघिणीची हत्या म्हणजे अपराध आहे. असा अपराध करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. अवनीच्या हत्येला कोण जबाबदार याची सरकारने चौकशी करावी आणि वनमंत्र्यांना पदावरून हटवावे असे गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
Tigress #Avni could have been saved if Maharashtra forest minister Sudhir Mungantiwar had been little more patient, sensitive and persistent. Request you to fix responsibility of killing&consider removing the minister from his post: Union Minister Maneka Gandhi to Maharashtra CM pic.twitter.com/gkOGDhTVn4
— ANI (@ANI) November 6, 2018
या वाघिणीला बेशुद्ध करून करुन पकडण्यास वन अधिकारी सक्षम असताना वनमंत्र्यांनी वाघिणीला मारण्याचे आदेश दिले. वन्यप्रेमींनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करत फक्त एका व्यक्तीची शिकारीची हौस भागवण्यासाठी असे आदेश देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मनेका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुनगंटीवार यांनी पदावरन हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सरकारकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. 13 जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला ठार करण्याचा निर्णय जनहितासाठी घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्नही करण्यात आले. मात्र, वाघिण आक्रमक झाल्याने तिला गोळ्या घालाव्या लागल्या असेही त्यांनी सांगितले. मनेका गांधी वन्यजीव प्रेमी असल्याने त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. त्यामुळे त्यांनी कठोर शब्दांत ट्विट केले असले तरी त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज फडणवी यांनी व्यक्त केली. मुनगंटीवार यांनी वाघिणीला मारण्याच्या आदेशाचे समर्थन केले आहे.


























































