
6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन मणिपुरी विद्यार्थ्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत. त्यांची हत्या करण्यापूर्वीची आणि नंतरचे फोटो दिसत आहेत. असे फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.
एका फोटोत दोन विद्यार्थी गवतावर बसलेले दिसत असून त्यांच्या मागे दोन सशस्त्र व्यक्ती दिसत आहेत. सोशल मीडियावर फिरत असलेल्या अन्य एका फोटोत दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह दिसत आहेत.
17 वर्षीय हिजाम लिंथोइंगम्बी आणि 20 वर्षीय फिजाम हेमजीत अशी या विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे.
ऑनलाइन फोटो समोर आल्यानंतर, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी जनतेला आश्वासन दिलं आहे की विद्यार्थ्यांचं अपहरण आणि हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल.
जुलै 2023 पासून बेपत्ता असलेल्या फिजम हेमजीत आणि हिजाम हिजाम लिंथोइंगम्बी या दोन विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे, असं मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
राज्यातील जनतेच्या मागणीनुसार हे प्रकरण यापूर्वीच सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.
‘राज्य पोलीस, केंद्रीय सुरक्षा एजन्सींच्या सहकार्यानं सरकार दोन विद्यार्थ्यांची हत्या करणार्या गुन्हेगारांना ओळखण्यासाठी या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहेत. सुरक्षा दलांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू केली आहे’, असंही निवेदनातून सांगण्यात आलं आहे.
‘या क्लेशदायक परिस्थितीत सरकार जनतेला आश्वासन देते की फिजाम हेमजीत आणि हिजाम लिंथोइंगम्बी यांचे अपहरण आणि हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर जलद आणि कठोर कारवाई केली जाईल. सरकार न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या जघन्य गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही गुन्हेगाराला कठोर शिक्षा ठोठावेल’, असं आश्वासन देण्यात आलं आहे.
सरकार जनतेला संयम बाळगण्यास आणि अधिकाऱ्यांना तपास हाताळण्यास मदत करण्याचं आवाहन करत असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयानं सांगितलं.




























































