>> वर्षा चोपडे
हिंदुस्थानातील काही मंदिरे गूढ, चमत्कारिक आणि अनाकलनीय आहेत. केरळचे वासुकी नागदेवतेचे मंदिर हे निसर्ग आणि अद्भुत कला दर्शवणारे आहे. इथल्या 30 हजार विविध आकारांच्या सुंदर कोरीवकाम असलेल्या काळ्या पाषाणातील प्रतिमा विलोभनीय आहेत. असे प्राचीन आणि भव्य मंदिर हिंदुस्थानात कुठेही नाही. सर्प देवतांचे सर्वोच्च उपासनेचे ठिकाण म्हणून मन्नरसाला मंदिर प्रसिद्ध आहे.
आपल्या देशातल्या गूढ मंदिरांपैकी एक असलेले सर्पदेवतेचे मन्नरसाला मंदिर! मन्नारसाला म्हणजे (मन-पृथ्वी, अरिया शीतल, साल- ठिकाण). असे म्हणतात जेव्हा परशुरामांनी क्षत्रियांच्या हत्येच्या पापाचे प्रायश्चित घेण्याचे ठरवले तेव्हा ते पवित्र ऋषींच्या जवळ गेले. त्यांनी सुचवले की, त्यांनी ब्राह्मणांना स्वतची जमीन भेट द्यावी. परशुरामांनी वरुण देवाला स्वतसाठी काही जमीन मिळवून देण्यासाठी प्रार्थित केले. ती भूमी म्हणजे सध्याचे केरळ असल्याचे मानले जाते.
सुरुवातीला केरळ खारटपणामुळे राहण्यायोग्य नव्हते. तिथे भाजीही उगवत नसल्याने लोक जागा सोडून जाऊ लागले. हे पाहून परशुरामांना दुःख झाले. त्यांनी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली, त्यांनी सल्ला दिला की, नागांचे ज्वलंत विष सर्वत्र पसरले तरच हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते आणि ते करण्याचे एकमेव साधन म्हणजे नागराजाची पूजा. त्यामुळे नागराजाला प्रसन्न करण्यासाठी ते आपल्या शिष्यांसह निर्जन जंगलाच्या शोधात निघाले. त्यांना केरळच्या दक्षिण भागात समुद्रकिनारी एक योग्य जागा मिळाली. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योग्य जागा मिळाल्याने समाधानी होऊन महान ऋषींनी तपश्चर्येसाठी तीर्थस्थला बांधली. तपश्चर्येने प्रसन्न झालेला नागराजा परशुरामांच्या समोर हजर झाला आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाला.
परशुरामांनी नागराजाला आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रार्थना केली. नागराजाने अत्यंत आनंदाने त्यांची विनंती मान्य केली. कालाकुडा विष पसरवण्यासाठी भयंकर सर्प तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विष झिरपल्यामुळे केरळची जमीन हिरवीगार होऊन राहण्यायोग्य बनली. त्यानंतर परशुरामांनी परमेश्वराला आपल्या चिरंतन उपस्थितीने या भूमीला सदैव आशीर्वाद देण्याची विनंती केली आणि तीही दयाळू स्वभावाच्या नागराजाने मान्य केली. या ठिकाणाचे पावित्र्य राखावे अशा महत्त्वाच्या सूचना दिल्यानंतर परशुराम महेंद्र पर्वतावर तप करायला निघून गेले. काही काळानंतर नागराजाच्या या भागावर दुर्लक्ष झाले. याच सुमारास नागराजाच्या निवासस्थानाभोवतीच्या जंगलात अनपेक्षितपणे आग लागली आणि जंगल जळून खाक झाले. ज्वाळांनी सर्पांचा छळ केला, त्यांना मोठय़ा कष्टाने खड्डय़ात लपून बसण्यास भाग पाडले. परंतु वासुदेव आणि श्रीदेवी या निसंतान दांपत्याने सापांची काळजी घेतली. अनेक सापांना त्यांनी जीवदान दिले. सर्वशक्तिमान नागराजा त्यांच्या अखंड तपश्चर्येने आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखवलेल्या प्रेमाने खूप प्रसन्न झाला. नागराजाने या जोडप्याला दर्शन दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला की, तो त्यांच्या मुलाच्या रूपात जन्म घेईल आणि सूर्य व चंद्र असेपर्यंत येथे मन्नारसाला कायमस्वरूपी राहीन. भाविक कुटुंबावर समृद्धीचा वर्षाव करीन आणि येथे येणाऱ्या सर्व भक्तांना संरक्षण देईन व तसेच घडले. त्या दांपत्याला दोन मुले झाली. त्यापैकी एक पाच फणा असलेले वासुकी भगवान यांचे मन्नारसाला स्वयंभू नाग मंदिर बनले. आईच्या हातानेच केवळ पूजा व्हावी ही नागराजाची इच्छा असल्यामुळे आजही या मंदिरात त्याच कुळातील वालिया अम्मा (ज्येष्ठ महिला) पूजा पद्धतीचे नेतृत्व करतात. नागदेवतांना प्रसन्न करण्यासाठी श्री नागराज आणि श्री सर्पयक्षिम्मा व्यतिरिक्त सर्व सर्प देवांना नूरम पलुम अर्पण केले जाते. विविध प्रकारच्या सर्प दोष, राहू दोष आणि कालसर्प योगापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्त येथे पूजा, अभिषेक करतात. अत्यंत सुंदर निसर्ग आलप्पीला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. जगातील एक गूढ आणि सुंदर मंदिर बघण्याचे भाग्यही निराळेच.
– [email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल
सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)